उत्तर भारतीयांविरोधात नेहमी टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. उत्तर भारतीय महापंचायत समितीने दिलेलं आमंत्रण राज ठाकरेंनी स्विकारल्यापासूनच सर्वांचं या कार्यक्रमाकडे लक्ष लागून राहिलं आहे. राज ठाकरेंनी आमंत्रण स्विकारणं अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. कारण राज ठाकरे यांनी नेहमीच उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर कायम आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबईतील कांदिवली येथे हा कार्यक्रम पार पडत आहे. राज ठाकरे प्रमुख वक्ते म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावेळी राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या शैलीत उत्तर भारतीयांवर टीका करणार की भूमिकेत काही बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

LIVE:

– एक दिवस मी घरी बसलो होतो तेव्हा संदिप देशपांडे यांनी विनय दुबेंना मला भेटायचं असल्याचं सांगितलं. मी काही बोललोच नाही आहे तर मग कशाला येत आहेत असं विचारलं तर तेव्हा निमंत्रण द्यायचं असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशमधील लोकांमध्ये काही गैरसमज आहेत, काही आंदोलनं झाली, मारहाण झाली यावर काही प्रश्न आहेत. तुम्ही येऊन त्यांच्याशी बोललात तर बरं होईल असं ते म्हणाले.

– गुजराती लोक मला येऊन भेटले होते. त्यांचंही हेच म्हणणं होतं. तेव्हा मी तिथे गेलो होतो. ते समोर ठेवून विनय दुबे यांनी निमंत्रण दिलं जे मी स्विकारलं. गुजरातींसमोर मी मराठीत भाषण केलं कारण त्यांना कळत होतं.

– फक्त तुमचा प्रश्न असता तर मराठीत बोललो असतो. पण हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमधील लोक पाहणार आहेत अस सांगितल्याने हिंदीत बोलत आहे.

– सत्य कटू असतं पण तुम्ही ते समजलं पाहिजे. मी शाळेत असल्यापासून हिंदी चांगलं आहे. माझ्या वडिलांचं उर्दू चांगलं होतं, त्यांच्यामुळे माझं हिंदी चांगलं आहे. दुसरं कारण म्हणजे चित्रपट. हिंदी भाषा चांगली आहे त्यात दुमत नाही, पण ती राष्ट्रभाषा आहे हे चुकीचं. राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालेलाच नाही.

– रेल्वे परीक्षेदरम्यान झालेली मारहाण, फेरीवाले यावर प्रश्न विचारण्यात आले. पहिल्यांदा आपण आपला देश समजला पाहिजे. आपल्या देशाची राज्यघटना, कायदा काय सांगतो हे समजलं पाहिजे, त्यामुळे इतर गोष्टी सहज होतील.

– या देशातील व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो असं म्हटलं जातं. पण कायदा कोणी वाचला आहे असं वाटत नाही. एक राज्य सोडून येता तेव्हा तुम्हाला पोलीस ठाण्यात जाऊन सर्व माहिती देणं गरजेचं असतं. एका राज्यातून आले आणि दुसऱ्या राज्यात गेले असं होत नाही. येथूनच खरी समस्या निर्माण होते. मी स्पष्टीकरण देण्यास आलेलो नाही, फक्त माझी भूमिका हिंदीतून सांगण्यासाठी आलो आहे.

– जर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध आहे, तर येथील तरुणांना प्रथम संधी मिळाली पाहिजे यामध्ये काय चुकीचं आहे. उद्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये इंडस्ट्री जात असेल तर तेथील लोकांना प्राथमिकता दिली पाहिजे. भारत आणि युरोपमध्ये जास्त फरक नाही. आपण ज्यांना राज्य म्हणतो तो एक देश आहे.

– उद्योगधंदे आणू न शकणारे उत्तर प्रदेशचे नेते अयशस्वी आहेत. जे पंतप्रधान झाले त्यातील 70 ते 80 टक्के उत्तर प्रदेशाचे होते. तुम्ही जे प्रश्न आहेत ते त्यांना का विचारत नाहीत. पंतप्रधान पदासाठी मतदारसंघ चालतो मग रोजगार का मिळत नाही. याचं कोणाकडेही उत्तर नाही.

– माझ्या राज्यात मराठी तरुण-तरुणींना प्राथमिकता दिली पाहिजे, उरले तर इतरांना द्या. एखाद्या राज्यात गेल्यानंतर त्याचा आदर केला पाहिजे. परदेशात गेल्यानंतर हिंदीत बोलतो का ? महाराष्ट्रात जे झालं त्याचं जे चित्र निर्माण कऱण्यात आलं ते इतर राज्यांच्या बाबतीत का नाही झालं.

– गोव्याचे मंत्री रवी नाईक यांनी भिकाऱ्यांची ट्रेन नको असं म्हणत बिहार ट्रेनला विरोध केला होता. तेव्हा कोणाचं रक्त उसळलं नाही, तेव्हा कोणी प्रश्न विचारला नाही. आसाममध्ये तर बिहारींची हत्या करण्यात आली होती. तिथे मोठं आंदोलन झालं होतं. त्याचंही काही झालं नाही. त्याबद्दलही कोणी बोलत नाही.

– एक महिन्यापूर्वी तर गुजरातमधून हाकललं होतं. 10 ते 15 हजार लोक मुंबईत आले. कोणत्याही राज्यातून हाकललं की मुंबईत येतात. आधीच बोजा कमी आहे का आमच्या राज्यावर. पण हा प्रश्न कोणी नरेंद्र मोदींना विचारत नाही. रेल्वेच्या नोकरीची जाहिरात महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्रात आली नव्हती. सर्व जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आल्या होत्या.

– आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. आमचे लोक भेटण्यासाठीही गेले होते. चर्चेसाठी आमचे लोक गेले ती भाषा ऐकून तुम्हीही खवळला असता. आमचे लोक काय हातावर हात ठेवून बसणार का ? उद्या मराठी लोकांनी उत्तर प्रदेशात जाऊन अशी भाषा वापरली तर तुम्ही आरती काढणार का ? अखेर ममता बॅनर्जी यांनी आदेश काढला.

– जर एका पत्राने समजत नसेल तर संघर्ष होणारच. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अपमानित होता असं वाटत नाही. तुमचा स्वाभिमान कुठे आहे….तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न का विचारत नाही.