भाजपने इतरांना देशप्रेमी किंवा देशद्रोहीपणाची प्रमाणपत्रे वाटण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपने देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटण्याचा प्रयत्न करू नये. जेएनयूमध्ये भाजपच्या विद्यार्थी संघटनेचे बस्तान बसविण्यासाठी हे सगळं घाणेरडं राजकारण सुरू आहे. काम करून दाखवता येत नसल्यामुळे भाजपकडून मतविभाजनाचे राजकारण केले जात आहे. अशाने एक दिवस दंगली घडतील, असा घणाघाती प्रहार राज यांनी पत्रकारपरिषदेत केला.
यावेळी राज यांनी ‘जेएनयू’ प्रकरणातील प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवरही टीका केली. मुळात विद्यापीठीय स्तरावरच्या या मुद्द्याच्या इतक्या खोलात जाण्याची गरजच काय होती, असा सवाल त्यांनी विचारला. त्याऐवजी स्थानिक पोलिसांना हा प्रश्न हाताळून द्यायला पाहिजे, होता असेही राज यांनी सांगितले.  भाजप आणि संघाच्या टोळ्या सध्या वर्तमानपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये बसल्या आहेत. या टोळ्यांकडून एखादी व्यक्ती देशप्रेमी किंवा देशद्रोही असल्याचे ठरवले जाते. नशिबाने जनतेने भाजपच्या हाती सत्ता दिली आहे. ती नीट चालविण्याऐवजी हे सगळे कसले उद्योग सुरू आहेत?, सरकार देश सांभाळतयं का महाविद्यालयं, असे सवाल राज यांनी पत्रकारपरिषदेत उपस्थित केले.