शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी सकाळपासून मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. तथापि पहिल्या स्मृतिदिनाला न गेलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी पोहोचल्याने राज व उद्धव एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले. दोघे एकत्र आले तर बाळासाहेबांचे स्वप्न साकार होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली तर सेना व मनसेतील नेते-कार्यकर्त्यांनी दोघांच्या मनोमीलनाची ही सुरुवात असल्याचे सांगितले.
शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी सकाळपासून शिवसैनिक येत होते. सेनेचे सर्व आमदार-खासदार तसेच नेते सकाळपासून उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील बहुतेक सर्व मंडळी उपस्थित होती. भाजपचे अनेक नेते ‘ट्विटर’वरून बाळासाहेबांना आदरांजली वाहात होते. सव्वा वाजता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे व नितीन सरदेसाई स्मृतिस्थळी आले. बाळासाहेबांना आदरांजली वाहिल्यानंतर राज यांनी उद्धव यांची भेट घेतली. उद्धव यांच्या शेजारी बसून राज यांनी त्यांच्याशी काही वेळ संवाद साधलाच, शिवाय त्यांच्या खांद्यामागील खुर्चीवर हात ठेवला. सेनेचे नेते रामदास कदम व संजय राऊत हेही राज-उद्धव यांच्या संवादात सामील झाले. हे दृश्य पाहून आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांनी शिवसेना झिंदाबादचे जोरदार नारेही दिले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून सातत्याने शिवसेनेला देण्यात येत असेलल्या अपमानास्पद वागणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज यांनी दुसऱ्या स्मृतिदिनी उपस्थित राहणे शिवसैनिकांना सुखावून गेले. राज-उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रातील चित्र बदलेल अशी प्रतिक्रिया उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, मराठी माणसाला हे दोघे भाऊ एकत्र आले तर निश्चितच आवडेल. तथापि तो निर्णय त्या दोघांनी घ्यायचा आहे. राज-उद्धव यांनी एकत्र यावे यासाठी बाळासाहेबांनीही प्रयत्न केले होते. आज जर ते एकत्र आले तर बाळासाहेब जेथे असतील तेथे त्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. सेना-मनसे या दोन शक्ती एकत्र आल्या तर निश्चितच राज्यात काही वेगळे घडू शकते असे सांगून भुजबळ यांनी भाजपला चिमटाही काढला. ही एक कौटुंबिक भेट होती याचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही, असे सांगून दोघे एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मात्र शिवसेना-भाजप एकत्र येईल आणि लवकरच शिवसेना सत्तेत सहभागी झालेली दिसेल असा विश्वास व्यक्त केला. मला केवळ आशा नाही तर विश्वास आहे की, हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर सेना-भाजप एकत्र येईल, असेही जोशी यांनी सांगितले.