उद्धव आणि जयदेव ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रावरून सुरू असलेल्या वादात मला पडायचे नाही, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये स्पष्ट केले. या प्रकरणी साक्ष देण्यासाठी बोलावण्यात येण्याची शक्यता असल्याचे मला समजले आहे. पण न्यायालयात जाण्याची मला सवयच आहे, अशीही टिप्पणी त्यांनी केली. दरम्यान, गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, मला काही बोलायचे नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
नाशिकमधील पूरस्थितीनंतर पाहणी करण्यासाठी राज ठाकरे गुरुवारी शहरात आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी उद्धव आणि जयदेव यांच्या वादात मला पडायचे नाही, असे स्पष्टपणे सांगितले. जयदेव ठाकरे यांच्याकडून मी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या सीडी न्यायालयात सादर करण्यात आल्याचे मला समजले आहे. पण मी जाहीर सभेतच बोललो आहे. त्यामुळे ते जाहीरच आहे, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी यावेळी केली.
बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत उद्धव यांनी त्यांची सगळी मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत जयदेव यांनी इच्छापत्राला न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर जयदेव यांची उद्धव यांच्या वतीने उलटतपासणी सध्या सुरू आहे.