तौते चक्रीवादळाचा फटका राज्यात अनेक ठिकाणी बसला आहे.  या वादळामुळे अनेकांच्या घरांचे व अन्य मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. कित्येकांचे संसार देखील उघड्यवार आले आहेत. त्यामुळे आता नुकसानग्रस्त मदतीची वाट पाहत आहेत. शासनाकडून पंचनामे व पाहणीचे कार्य सुरू आहे. दरम्यान, वादळामुळे उध्वस्त झालेलं पुन्हा एकदा नव्याने उभं करण्याचं आवाहन अनेकांसमोर सध्या निर्माण झालेलं आहे. यामध्ये वसईतील एका वृद्धाश्रमाचाही समावेश आहे. याच वृद्धाश्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्तींना शिक्षणाचे धडे दिले आहेत. शिक्षिका वास्तव्यास असून त्यांनी मदतीसाठी दिलेल्या आर्त हाकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे धावून आले आहेत.

आपल्या शिक्षिका सुमन रणदिवे यांच्याशी राज ठाकरे यांनी मोबाइलवरून संवादही साधला आहे. रणदिवे राहत असलेल्या वृद्धाश्रमाचं तौते चक्रीवादळात मोठं नुकसान झालं आहे. यामुळे सुमन रणदिवे यांनी मदतीसाठी राज ठाकरे, जयंत पाटील यांना आवाहन केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी सुमन रणदिवे यांना फोन करून त्यांची विचारपूस केली.

राज ठाकरे व सुमन रणदिवे यांच्यातील फोनवरील संभाषण –

सुमन रणदिवे – राजा..
राज ठाकरे – नमस्कार कशा आहात?
सुमन रणदिवे – मी सुमनताई रणदिवे, वसई येथून बोलत आहे. तुमच्या घरी शिकवणीसाठी यायचे माहिती आहे ना?
राज ठाकरे – हो.. बोला.. काय त्रास झाला तुम्हाला? काय अडचण आली.
सुमन रणदिवे – मध्यंतरी तू क्रिकेट मैदानावर आला होता, तेव्हा त्या लोकांनी मला तुझी भेट दिली नाही. आमचं खूप नुकसान झालं आहे, जरा जास्तीत जास्त मदत करता आली तर बघशील.
राज ठाकरे – मी आमच्या अविनाश जाधव यांना सांगितलेलं आहे, इतरही सर्वजण आहेत. ते आपल्याला सर्वप्रकारची मदत करतील. आपण काही काळजी करू नका. आपली तब्येत ठीक आहे ना?
सुमन रणदिवे – कुंदाताई काय म्हणतात?
राज ठाकरे – आई बरी आहे.
सुमन रणदिवे – तू ये एकदा मला भेटायला..
राज ठाकरे – मी येतो..एकदा लॉकडाउन संपू द्या.. मी येतो.

९० वर्षीय सुमन रणदिवे दादरमधील बालमोहन विद्यामंदिरात शिक्षिका होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना त्यांनी शिकवलं आहे. १९९१ मध्ये त्या निवृत्त झाल्या. पतीच्या आणि मुलाच्या निधनानंतर सुमन रणदिवे यांनी वृद्धाश्रमात आश्रय घेतला. वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ केअर” या वृद्धाश्रमात त्या राहत आहेत.

“उद्धव बेटा मी तुझी शिक्षिका बोलतीये; कृपया मदत कर,” ९० वर्षीय सुमन रणदिवेंची आर्त हाक

सुमन रणदिवे यांच्यासोबत वृद्धाश्रमात २५ हून अधिक वृद्ध राहतात. तौते चक्रीवादळामुळे असलेल्या वृद्धाश्रमाचे पत्रे उडाले असून इतरही नुकसान झालं आहे. पत्रे उडून गेल्यामुळे सर्व सामान, कपडे, कागदपत्रंही भिजली असून सर्वांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान आवाहन केल्यानंतर त्यांना शिवसेना, मनसे तसंच प्रशासनाकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.