बौद्ध धर्म स्वीकारण्यावरून ठिणगी; उत्तर प्रदेश निवडणुकीतील परिणामाची धास्ती

एरव्ही महाराष्ट्रातील रिपब्लिकन नेत्यांवर प्रस्थापितांचे बगलबच्चे असा आरोप करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना, तुम्ही अजून बौद्ध धर्माचा स्वीकार का केला नाही, हा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा प्रश्न चांगलाच जिव्हारी लागला. एरव्ही आठवले यांना बेदखल ठरविणाऱ्या मायावती यांना उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत दलित मतांवर परिणाम होण्याच्या धास्तीने आठवलेंच्या या प्रश्नाला आपण बौद्ध धर्म स्वीकारणारच आहोत, असे प्रत्युत्तर देणे भाग पडल्याचे मानले जात आहे.

देशात अलीकडे दलितांवरील अत्याचाराच्या काही गंभीर घटना घडल्या आहे. गुजरातमधील उना येथील घटेनेने तर सत्ताधारी भाजप अडचणीत सापडला आहे. त्या पाश्र्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री झालेल्या रामदास आठवले यांनी दलितांना बौद्ध धर्माचा स्वीकार करावा असे आवाहन करतानाच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या मायावती यांनी अजून बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, असा थेट सवाल करून एका वेगळ्याच राजकीय वादाला तोंड फोडले.

मायावती स्वत:ला देशातील दलितांच्या एकमेव नेत्या समजतात. फुले-शाहू-आंबेडकर यांना त्या आदर्श मानतात. परंतु महाराष्ट्रात त्यांचा पक्ष कधीच राजकीय मूळ धरू शकला नाही. अलीकडे तर डॉ. सुरेश माने यांच्यासारखा अभ्यासू व चांगले संघटन कौशल्य असलेला मोहरा बाहेर पडल्याने पक्षाची शकलेच झाली आहेत. बसपचे संस्थापक कांशिराम ते सध्याच्या पक्षाच्या प्रमुख मायावती या महाराष्ट्रातील रिपब्लिकन नेत्यांची दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे नेते, अशी कायम संभावना करीत असे. त्यामुळे महाराष्ट्रातील बौद्ध समाजाने मायावती यांच्या बसपला म्हणावी तशी कधीच साथ दिली नाही.

रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना अलीकडेच केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. उत्तर प्रदेश व अन्य राज्यांतील निवडणुकांमध्ये दलितांची मते मिळविण्यासाठी भाजप त्यांच्या मंत्रिपदाचा वापर करणार आहे. त्याचा भाजपला किती फायदा होईल, याबाबत मात्र साशंकताच आहे.

या पूर्वी रामदास आठवले यांनी मायावती यांच्या राजकारणावर अनेकदा टीका केली. किंबहुना, त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, असा जाहीर प्रश्नही विचारला होता. परंतु त्या वेळी मायावती यांनी त्याची कसलीही दखल घेतली नव्हती. या वेळी मात्र आठवलेंच्या त्या विधानाची दखल त्यांना घ्यावी लागली. फुले-शाहू-आंबेडकरांबरोबरच गौतम बुद्धाच्या नावाने मायावती यांनी उत्तर प्रदेशात अनेक वास्तू उभ्या केल्या. मायावती यांना मानणारा दलित वर्ग स्वत:ला हिंदू धर्मापासून वेगळा समजू लागला आहे. बौद्ध धर्माचेही त्याला आकर्षण आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. बाबासाहेबांना मानणाऱ्या मायावती यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, या आठवले यांच्या विधानामुळे त्यांचा मतदार विचलित होऊन निवडणुकीत त्याचा परिणाम होईल, अशी त्यांना धास्ती वाटत असावी. त्यामुळेच आठवले यांच्या प्रश्नाला मायावती यांना तातडीने प्रत्युत्तर द्यावे लागले, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.