भाजपाचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, चव्हाण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे सांगत कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२००२ ते २०१७ या काळात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि फसवणूक केल्याची तक्रार मधू चव्हाण यांच्याविरोधात त्यांच्याच शैक्षणिक संस्थेतील एका कर्मचारी महिलेने केली आहे. यापूर्वीही चव्हाण यांच्याविरोधात दोन वेळा अशा स्वरुपाची तक्रार संबंधीत महिलेने केली होती. मात्र, वारंवार आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

चव्हाण म्हणाले, संबंधीत महिलेकडून माझ्याविरोधात वारंवार खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. २०१७पासून गेल्या सात आठ महिन्यांत पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली, चौकशीत हे आरोप धादांत खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडे या तक्रारदार महिलेची खोटी तक्रारदार म्हणून नोंद आहे.

त्यामुळे पोलिसांनी या महिलेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. मात्र, आमची तक्रार घेतली जात नाही असे सांगत संबंधीत महिलेने न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना ही तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेश दिले. मात्र, चौकशीअंती सत्य उघड होईल. त्यानंतर योग्य वेळी मी आपली भुमिका जाहीर करेन. मी म्हाडाचा चेअरमन झाल्यापासून मुद्दामहून माझ्यावर हे आरोप केले जात आहेत. माझे राजकीय करिअर उद्धवस्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.