|| संदीप आचार्य

भारतातील पहिली तर जगातील पाचवी शस्त्रक्रिया

अवघ्या सात वर्षांच्या इशिकाच्या हृदयात जन्मत:च दोन छिद्रे होती. अशी एकही यशस्वी शस्त्रक्रिया यापूर्वी भारतात झालेली नव्हती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी एक आव्हानच होते. महापालिकेच्या शीव रुग्णालयातील हृदयविकार विभागाचे प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांनी हे आव्हान स्वीकारून यशस्वी करून दाखवले. हृदयात दोन छिद्रे असताना बिनटाक्याची ही भारतातील पहिली शस्त्रक्रिया असून जगात अशा प्रकारच्या केवळ पाच शस्त्रक्रिया आतापर्यंत झाल्या आहेत.

भंडारा जिल्ह्यातील पासलपापाणी गावात राहणारी इशिका हिला जन्मत:च हृदयरोगाचा त्रास होता. तिच्या हृदयात दोन छिद्रे होती. (अ‍ॅट्रियल सेप्टल डिफेक्ट -एएसडी व पेटंट डक्टस अ‍ॅट्रियॉसिस -पीडीए) यामुळे तिला वारंवार न्यूमोनियाचा त्रास होत होता तसेच सतत धाप लागायची. तिचे वजनही वाढत नव्हते. सततच्या आजारपणामुळे तिची शाळा बुडायची, शिवाय आजारपणाचा खर्चही परवडेनासा झाला. दोन छिद्रे आणि वजन कमी असल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यास हृदय शल्यचिकित्सक तयार नव्हते. अशा परिस्थितीत भंडारा येथील डॉक्टरांनी मुंबईत पालिकेच्या शीव रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे खासगी रुग्णालयात जाणे तिच्या पालकांना शक्य नव्हते. शीव रुग्णालयातील हृदयविकार विभागातील प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांनी सखोल तपासणी केल्यानंतर इशिकावर बिनटाक्याची हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पायाच्या रक्तवाहिनीमधून तार घालून हृदयापर्यंत नेऊन दोन्ही छिद्रे यशस्वीरीत्या बंद केली. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुतींची व जोखमीची होती. यासाठी हृदयशल्यविभागातील डॉक्टरांनाही तयार ठेवण्यात आले होते. या शस्त्रक्रियेत विभाग प्रमुख डॉ. प्रताप नाथानी व सहयोगी प्राध्यापक डॉ. मिलिंद फडके तसेच डॉ. अभय तिडके यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली आहे.

भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून त्याआधी तैवानच्या डॉ. हो सी एल व फू एफ सी यांनी दोन तर डॉ. आतिक खान यांनी दोन हृदयशस्त्रक्रिया केल्याचे डॉ. महाजन म्हणाले. बिनटाक्याच्या छिद्र बंद करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गेल्या चार वर्षांत ७७ शस्त्रक्रिया शीव रुग्णालयात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शीव रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात दररोज किमान १०० रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात उपचारासाठी येत असतात. यात लहान मुलांचे प्रमाण आठवडय़ाला ३० ते ३५ असून त्यापैकी पाच ते सात मुलांच्या हृदयावर महिन्याकाठी शस्त्रक्रिया केल्या जातात. वर्षभरात साडेतीनशे शस्त्रक्रिया आम्ही करतो, असेही डॉ. महाजन म्हणाले.