कार्यक्षमता, इच्छाशक्तीबाबत प्रश्नचिन्ह

पश्चिम आफ्रिकेत गुंड रवी पुजारीच्या अटकेने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमता आणि इच्छाशक्तीबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. पुजारीविरोधातील सर्वाधिक गुन्ह्य़ांचा तपास करणारे मुंबई पोलीस त्याचा परदेशातील नेमका ठावठिकाणा शोधण्यात अपयशी ठरले की तो माहीत असूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेले, अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सांताक्रुजच्या श्रीकांत मामा नावाच्या गुंडाकडे हरकाम्या असलेला पुजारी काही वर्षांत या टोळीचा प्रमुख बनला. छोट राजनच्या विश्वासू हस्तकांपैकी एक झाला. मात्र बँकॉक येथील राजनवर घडलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पुजारीने स्वतंत्र बस्तान बसवले. त्यानंतर पुजारीने बॉलीवूड क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजकांना खंडणीसाठी धमकावले, काहींवर हल्ले घडवून आणले, काहींच्या निवासस्थानापासून कार्यालयांवर गोळीबार घडवला. खबऱ्यांकरवी बडय़ा असामीची इत्थंभूत माहिती घ्यायची, फोनवरून धमक्या द्यायच्या, नाही ऐकले तर भीती घालण्यासाठी हस्तकांकरवी गोळीबार घडवून आणायचा, त्या ठिकाणी शिव्या हासडणारी चिठ्ठी सोडायची, ही पुजारीची गुन्ह्य़ाची पद्धत. अशा एका गुन्ह्य़ाद्वारे शंभर जणांना फोन करून खंडणी उकळण्यात पुजारी पटाईत होता. ३० वर्षांच्या गुन्हेगारीत त्याच्याविरोधात सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंद झाले. बहुतांश गुन्ह्य़ांचा तपास गुन्हे शाखेने केला. यातील अनेक गुन्हे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) नोंदवण्यात आले.

पुजारीच्या गुन्हेगारी कारवायांची सुरुवात मुंबईतून झाली. त्याच्याविरोधातील सर्वाधिक गुन्ह्य़ांचा तपास मुंबई पोलिसांनी केला. त्याच्या असंख्य साथीदारांना बेडय़ा ठोकल्या. फरार आरोपींचा ठावठिकाणा, हालचालींची माहिती देणारे खबऱ्यांचे सशक्त जाळे आणि अद्ययावत यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. असे असताना बंगळुरू पोलीस पुजारीचा माग काढण्यात यशस्वी ठरले. पुजारीची नेमकी माहिती मुंबई पोलिसांना नव्हती की त्याच्याविरोधात कारवाई करण्याची इच्छा नव्हती, असा प्रश्न पोलीस दलातील आजी-माजी अधिकारी उपस्थित करत आहेत.

पोलीस-पुजारी संबंधांवर प्रकाश

२००८ नंतरच्या दहा वर्षांमध्ये पुजारी आणि मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची जवळीक वाढली. हे संबंध उघड झाल्याने काही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे, असा अहवाल संबंधित विभागाच्या प्रमुखाने वरिष्ठांकडे पाठवला आहे. अद्याप त्या अहवालावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला नाही, अशी खात्रीलायक माहिती मिळते. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, कर्नाटक पोलिसांच्या चौकशीतून पुजारीशी संबंधित अधिकाऱ्यांचे बिंग फुटण्याची दाट शक्यता आहे.