सरकार आणि आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकाऱ्यांसोबतची बैठक समाप्त झाली आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूने सहमती मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सरकार आणि आरबीआय यांच्यातली बैठक ही वादळी ठरेल असे वाटत होते. मात्र अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे असे समजते आहे. आरबीआयने लघु उद्योगांसाठीचे कर्ज वाढवण्यास सहमती दर्शवली आहे असे समजते आहे. ९ तास चाललेल्या या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

आरबीआय सेंट्रल बोर्ड इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क (ईसीएफ) साठी एक समिती नेमण्यात येईल असाही निर्णय झाला आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि इतर डेप्युटी गव्हर्नर यांच्या मंडळाने सरकारकडून आलेल्या सुभाषचंद्र गर्ग आणि अर्थविषयक सेवा सचिव राजीव कुमार तसेच निर्देशक एस गुरुमूर्ती यांच्याशी अनेक मुद्द्यांवर समोरासमोर चर्चा झाली. जे मुद्दे वादग्रस्त होते ते सहसहमतीने मिटवण्याचा प्रयत्न या बैठकीत दिसून आला. वादाच्या मुद्द्यांवर सुवर्णमध्य कसा गाठता येईल हेदेखील या बैठकीत चर्चिले गेले.

आरबीआय सेंट्रल बोर्ड इकॉनॉमिक फ्रेमवर्कवर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमली जाईल या समितीला आरबीआयने मान्यता दिली आहे असेही समजते आहे. या समितीचे सदस्य कोण असतील याचा निर्णय आरबीआय आणि सरकार यांचा असेल.