मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. यावर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करावा लागेल, असं राऊत म्हणाले आहेत. तसेच, या देशातील कोणतीही तपासयंत्रणा म्हणजे परमेश्वराचा अवतार नसतो, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.

माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, “मी एवढंच सांगेन प्रकरण थोडं राजकीय देखील आहे, या देशातील कोणतीही तपासयंत्रणा म्हणजे परमेश्वराचा अवतार नसतो. तपास हा त्या त्या पद्धतीने होत असतो. काल ममता बॅनर्जींनी देखील केंद्रीय तपास यंत्रणेबाबत काही टिप्पणी केली आहे, अन्यजण देखील करतात. पण शेवटी आपण न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयासमोर मान झुकवतो व आदर करतो.”

तसेच, “न्यायालयाच्या संपूर्ण निकालाचा अभ्यास करावा लागेल. सरकारला एक विधी व न्याय खातं असतं. जे काय निकालपत्र आहे, त्याबाबत सरकार अभ्यास करेल. माझा काही व्यक्तीशा संबंध नाही. महाविकासआघाडी म्हणून म्हणाल तर शेवटी या संपूर्ण निकाल पत्राबाबत सरकारच्यावतीनेच मत व्यक्त केलं पाहिजे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला असेल आणि त्या संदर्भात तेच बोलतील किंवा त्यांच्यावतीने कोणीतरी बोलेल. पूर्ण निकाल काय आहे तो अजून मी पाहिलेला नाही. मीडियाच्या माध्यामातून जी काही माहिती मला मिळालेली आहे. त्यावर विसंबून राहून कोणतीही प्रतिक्रिया मला देता येणार नाही. कारण जो काही असेल तो उच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असेल अशाप्रकारे तर त्याचा संपूर्ण अभ्यास करायला हवा. कोणतंही मत व्यक्त करणं आणि निर्णय घेणं सरकारने किंवा कोणत्या राजकीय पक्षानं हे योग्य नाही.” असंही यावेळी राऊत यांनी सांगितलं.

अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

याशिवाय, “निर्णय़ जर मुंबई उच्च न्यायालयाकडून आला असेल, तर संपूर्ण निर्णयाचा अभ्यास करावा लागेल. कारण हे प्रकरण न्यायालयाशी संबंधित आहे. उच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवलं आहे, गृहमंत्र्यांशी निगडीत प्रकरण असल्याने सरकारच्यावतीने कुणी अधिकृत व्यक्ती बोलेल. सरकारकडे एक विधी व न्याय खातं आहे. शरद पवार, मुख्यमंत्री ते चर्चा करतील मग सरकारचं म्हणणं समोर येईल. मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही. मला त्या निर्णयाबाबत संपूर्ण माहिती नाही. अशावेळी राज्याच्या गृहमंत्र्यांबाबत काही मत व्यक्त करणं, हे योग्य नाही.” असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.