मुंबईत गगनाला भिडलेल्या जागांच्या किमती परवडत नसल्यामुळे विस्तारित उपनगर म्हणून नावारूपाला आलेल्या मीरा रोड, वसई, नालासोपारा तसेच विरार या परिसरांत घरे खरेदी करणाऱ्यांना आता रेडी रेकनरमधील दहा टक्के वाढीमुळे मुद्रांकवाढीचा फटका बसणार आहे. या वाढीमुळे रेडी रेकनरच्या नव्या दरांनी बिल्डरांशी स्पर्धा केली आहे. परिणामी आता बिल्डरांना मिळणाऱ्या रोखीच्या स्वरूपातील काळ्या पैशावरही आपसूकच नियंत्रण येणार आहे. मीरा रोड, विरारमधील रेडी रेकनरचे दर हे बिल्डरांच्या दरांजवळ पोहोचले आहेत.
मीरा रोड परिसरात सुविधांनुसार दरात फरक आहे. साधारणत: सहा हजार रुपयांपासून सुरू होणारे हे दर काही आलिशान संकुलासाठी आठ हजारांच्या घरात आहेत. सध्या मंदीच्या काळात बिल्डर सहा ते सात हजार रुपये दराने घरे देऊ करीत आहेत. २०१५ साठी जारी झालेल्या रेडी रेकनरच्या दरानुसार मीरा रोडमधील दर सहा हजार ७००च्या घरात पोहोचला आहे. बिल्डरांनी सहा हजार रुपयांनी घर देऊ केले तरी प्रत्यक्षात ग्राहकाला रेडी रेकनरच्या दरानुसारच करारनामा करावा लागणार आहे. त्यामुळे बिल्डरांचे फावणार आहे.
विरार परिसरातील घरांचे दर सध्या चार ते पाच हजार चौरस फुटाच्या घरात आहेत. रेडी रेकनरचे दर चार हजार रुपये प्रति चौरस फूट इतके झाले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत विरारमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्या वेळी बिल्डरांनी तीन ते चार हजार रुपये दराने ग्राहकांना घरे देऊ केली होती. सध्या रेडी रेकनरचा दर वाढल्याने आता बिल्डरांनीही आपले दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. वसई, नालासोपारा परिसरातील दरांतही दहा टक्के वाढ झाली असली तरी तेथील दर फारसे वाढलेले नाहीत. वसई पश्चिम आणि पूर्व या दरांत कमालीची तफावत आहे. नालासोपारा परिसरात रेडी रेकनरच्या दरात वाढ झाली असली तरी बिल्डरांचे दर फारसे वाढलेले नाहीत.
रेडी रेकनरच्या दराशी नोंदणी व मुद्रांक विभागाचा काहीही संबंध नाही. नगर नियोजन विभागाचे अधिकारी हे दर निश्चित करतात. आम्ही फक्त माहिती देतो. या माहितीवरून साधारणत: सरासरी काढून नंतर मग निश्चित केले जातात. खासगी बिल्डरांचे खरेदी-विक्री व्यवहार याचाही विचार केला जातो, असे ठाणे नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

रेडी रेकनरचे दर बिल्डरांच्या दराशी स्पर्धा करीत असल्याचा फायदा आम नागरिकांनाच होणार आहे. प्राप्तीकर विभागाकडून रेडी रेकनरचाच दर मान्य केला जातो. त्यामुळे बिल्डरांनाही आता काळा पैसा मागण्यावर बंधन येऊ शकते. रेडी रेकनरचे नवे दर ठरविताना मागील वर्षांतील दर आणि प्रत्यक्ष झालेले व्यवहार यांचा विचार करून सरासरी दर ठरविला जातो. त्यानंतर शहर नियोजन विभागाकडून दर निश्चित केले जातात
-ठाणे नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी