प्रसाद रावकर

करोनाबाधित रुग्णांकडून घेण्यात आलेले अधिक पैसे आणि एका रुग्णाच्या मृत्यूप्रकरणानंतर पालिकेने माहीममधील एका रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांची ४८ तासांत अन्यत्र व्यवस्था करावी किंवा त्यांना घरी पाठवावे, तसेच नव्या रुग्णांना प्रवेश देऊ नये असे आदेशही पालिकेने दिले आहेत.

माहीममधील क्रॉस रोड क्रमांक २, एम. एम. चोटानी मार्गावरील ‘फॅमिली केअर’ हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सुमारे एक ते दीड हजार करोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यात पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र या रुग्णालयाने आपल्याकडून उपचारासाठी सरकारी दराऐवजी अधिक पैसे घेतल्याची तक्रार करोनामुक्त झालेल्या काही व्यक्तींनी पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाकडे केली होती.

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा करोना अहवाल नकारात्मक आला होता. तरीही त्याच्यावर करोनाविषयक उपचार करण्यात येत होते. तसेच त्याला आवश्यक असलेले औषध आणण्यासाठी भलत्याच रुग्णाच्या नावाची चिठ्ठी देण्यात आली होती, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. स्थानिक भाजप नेत्यांनी याप्रकरणी रुग्णालयावर हल्लाबोलही केला. रुग्णाचे नातेवाईक आणि भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर के लेल्या आंदोलनाची चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांनी सांगितले.

रुग्णाचा  मृत्यू आणि यापूर्वीच्या ‘कारणे दाखवा’ नोटीसला उत्तर न दिल्यामुळे ‘बॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट १९४९’अंतर्गत रुग्णालयाची  नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्यचे आदेश गुरुवारी  देण्यात आले.

पैसे परत केल्याचा दावा

फॅमिली केअर हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार, करोनामुक्त झालेल्या रुग्णाकडून जास्त पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे पैसे परत करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान २५ जुलैला मृत्यू झालेल्या रुग्णाची प्रकृती खालावली होती. त्याचा करोनाचा चाचणी अहवाल नकारात्मक आला होता, परंतु त्याला करोनाची लक्षणे होती. रुग्णाच्या औषधासाठी अन्य रुग्णाच्या नावाने चिठ्ठी देण्यात आली नव्हती. रुग्णालयात बुधवारी गोंधळ झाला होता. त्यामुळे पालिकेशी संपर्क साधणे शक्य झाले नाही. तरी पालिकेने आमचे म्हणणे मांडण्यासाठी एक संधी द्यावी, असेही या रुग्णालयाने म्हटले आहे.

रुग्णांनी तक्रार केल्यानंतर ‘फॅमिली केअर’ रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, परंतु रुग्णालयाच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’