युरोप, अमेरिकेतील प्रगत शहरांप्रमाणे रस्त्यांवरील प्रत्यक्ष रहदारीचा अंदात घेत वाहतुकीचे नियमन करणारी अद्ययावत यंत्रणा मुंबईत सुरू होणार आहे. सॉफ्टवेअरच्या सूचनांवर कार्यरत अद्ययावत सिग्नल प्रणाली हा या यंत्रणेचा गाभा आहे. एखादे वाहन रस्त्यावर आल्यानंतर कुठेही न थांबता थेट इच्छित स्थळी पोहोचावे, हा या यंत्रणेचा मुख्य उद्देश आहे.

सध्या अस्तित्वात असलेले सिग्नल ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्य करतात. म्हणजे किती सेकंद हिरवा रंग दाखवून वाहने सोडावीत, वाहने रोखण्यासाठी किती सेकंद लाल रंग कायम ठेवावा हे ठरलेले असते. सकाळ-संध्याकाळ घाईच्या वेळेत एकाच मार्गावरून, एकाच दिशेने वाहनांची रहदारी वाढते तेव्हा वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पोलीस सिग्नलचे वेळापत्रक बदलतात. त्यानेही कोंडी सुटली नाही की सिग्नल बंद करून किंवा फ्लॅशर म्हणजे पिवळा सिग्नल लुकलुकता ठेवून स्वत: वाहतुकीचे नियमन करतात.

‘इंटेलिजेन्ट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम’ (आयटीएमएस) ही नवी यंत्रणा अस्तित्वात आल्यानंतर ही कसरत थांबेल, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. या यंत्रणेंतर्गत शहराच्या प्रत्येक सिग्नलवर (चहुबाजूंनी) सेन्सर, रडार बसवण्यात येतील. ही उपकरणे संबंधित चौकातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा अंदाज घेतील आणि सॉफ्टवेअरला कळवतील. अशा पद्धतीने सॉफ्टवेअरला शहरातील प्रत्येक सिग्नलवरून क्षणोक्षणी अंदाज मिळतील. ही माहिती घेऊन सॉफ्टवेअर किती सेकंद वाहतूक सोडावी, रोखावी या सूचना सिग्नलला देईल. त्यानुसार सिग्नल हिरवा, लाल होऊन आपले कार्य करेल. यात एकाच चौकातील वाहनांची कोंडी फोडण्याऐवजी किंवा वाहतूक सुरळीत करणे हा उद्देश नाही. तर त्या चौकापुढील, मागील, शेजारील चौकांमधून पुढे-मागे जाणाऱ्या वाहतुकीवर काय परिणाम होईल याचा अंदाज घेऊन सॉफ्टवेअर सिग्नलना सूचित करेल.

अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही यंत्रणा सुरू करण्याचा, त्यासाठी आवश्यकत तो निधी पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अद्ययावत सिग्नल, उपकरणे जोडून ही यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यास दीड वर्षांचा काळ जाईल. शहरातील ६१७ चौकांमधील सिग्नलवर रडार, सेन्सर आणि अद्ययावत कॅमेरे बसवले जातील. त्यासाठी ८९१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

काय होणार?

* संध्याकाळच्या सुमारास सातरस्ता चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर विविध रस्त्यांवरील रहदारीचा एकाचवेळी अंदाज घेऊन या परिघातील सर्व सिग्नलना काय करावे याचे आदेश देईल.

* या यंत्रणेत सिग्नल मोडण्यासह वाहतुकीचे अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना परस्पर ई-चलन बजावण्याची व्यवस्था असेल.

सेन्सरमुळे एकाच वेळी शहरातील सर्वच रस्त्यांवरील प्रत्यक्ष रहदारीची, वाहनांच्या संख्येची माहिती क्षणाक्षणाला मिळेल आणि त्यानुसार कुठली वाहतूक किती वेळ रोखायची, किती वेळ सोडायची याचे निर्णय सॉफ्टवेअर परस्पर घेईल. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास मनुष्यबळ वाचेल.

– मधुकर पांडे, पोलीस सहआयुक्त (वाहतूक)