जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन विशेष * टाळेबंदीमुळे वृद्धाश्रमातील भेटीगाठी, कार्यक्रम बंद 

मुंबई : कोणालातरी आज ना उद्या आपली आठवण येईल या आशेवर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक जीवन कंठत आहेत. दिवसभराची विश्रांतीच त्यांना आता छळू लागली आहे. करोना टाळेबंदीमुळे वृद्धाश्रमातील भेटीगाठी, कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे काय करावे, कोठे जावे असा प्रश्न ज्येष्ठांना छळू लागला आहे. दुसरीकडे करोनाच्या साथकाळात ६२ टक्के ज्येष्ठांना कौटुंबिक छळाला तोंड द्यावे लागत आहे.

१५ जून या ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिना’निमित्त ‘हेल्पेज इंडिया’ने मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू या शहरांमध्ये के लेल्या सर्वेक्षणातून हे सत्य उजेडात आले आहे. सर्वेक्षणात सहा शहरांतील ३ हजार ५२६ ज्येष्ठांचा सहभाग आहे.

टाळेबंदीपूर्वी कु टुंबातील एखादी व्यक्ती भेटायला येत असे. त्याचबरोबर वृद्धाश्रमात होणारे वाढदिवस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने ज्येष्ठांना विविध वयोगटातील लोकांचा सहवास मिळत असे. गप्पा-गोष्टी करता येत असत. परंतु गेल्या दीड वर्षांपासून वृद्धाश्रमात बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे वृद्धाश्रमांचा जगाशी संवाद थांबला आहे. अनेक ज्येष्ठांना निराशेने ग्रासले आहे.

आपल्याशी बोलण्यासाठी कोणीतरी दूरध्वनीद्वारे संपर्क  साधेल अशा आशेवर बसलेल्या ज्येष्ठांचे प्रमाण ३५.७ टक्के  आहे. ३६.५ टक्के  ज्येष्ठांना दिवसातील जास्तीतजास्त वेळ के वळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. २०.५ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी सहवासात कोणीतरी असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. दिवसभरात मन गुंतवण्यासाठी फारसे काही नसल्याने २२.६ टक्के  ज्येष्ठ दिवस संपण्याची प्रतीक्षा करतात. १३.७ टक्के  ज्येष्ठांमध्ये निराशेची भावना आहे.

गेल्या वर्षी टाळेबंदीच्या सुरूवातीच्या तक्रारी आणि यंदाच्या तक्रारी यांत फरक आहे. गेल्या वर्षी ज्येष्ठांना किराणा वगैरे मिळण्यात येणाऱ्या अडचणी जास्त होत्या; पण आता दीड वर्षांच्या टाळेबंदीमुळे ज्येष्ठांच्या एकटेपणात वाढ झाली आहे.

प्रकाश बोरगावकर, संचालक, हेल्पेज इंडिया

आम्ही बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करून घेतले आहे. आम्ही त्यांना सतत व्यग्र ठेवले, त्यामुळे एकटेपणा फार जाणवला नाही.

मनिषा कोटक, विश्वस्त, आनंद वृद्धाश्रम, पालघर 

आर्थिक अवलंबित्व वाढले

करोना काळात कमावत्या ज्येष्ठ नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच व्यवसायावरही परिणाम झाला. काही कुटुंबातील सदस्यांवरही बेरोजगारी अथवा पगार कपातीची वेळ आली. परिणामी कुटुंबाचे उत्पन्न घटल्याचे ५२ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. त्यामुळेही अनेक ज्येष्ठांचे कुटुंबावरील अवलंबित्व वाढल्याचे सर्वेक्षणातील निष्कर्ष आहेत.

सहवास, संपर्क तुटला

करोना टाळेबंदीमुळे वृद्धाश्रमात भेटी देणाऱ्यांवर बंधने आली आहेत. सर्वेक्षणासाठी संपर्क साधलेल्या ८१ टक्के वृद्धाश्रमांनी बाहेरील व्यक्तींसाठी प्रवेश बंद केला आहे. ६८.९ टक्के वृद्धाश्रमांनी ज्येष्ठांच्या बाहेर जाण्यावर बंधने घातली आहेत. परिणामी गेल्या वर्षभरापासून ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमात अडकून पडले आहेत. दुसरीकडे वृद्धाश्रमांनाही या काळात आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. दानशूर व्यक्तींकडून मिळणारी मदतही आटल्याचे ५० टक्के वृद्धाश्रमांनी सांगितले.

भेटीसाठी वेळ नाही, संपत्ती मात्र हवी आहे..

एक वर्ष आम्ही वृद्धाश्रमातून बाहेर येणे-जाणे बंद केले होते. विशेष काळजी घेऊनही आमच्या वृद्धाश्रमात काही जणांना करोनाचा संसर्ग झाला. त्यातील काही जणांचा मृत्यू झाला. पालकांचा मृत्यू झाल्यावर त्यांची मुले त्यांचे साहित्य घेण्यासाठी आली. त्यांच्या कपाटात पासबुक अथवा काही कागदपत्रे आहेत का याचाच शोध मुले घेत होती. अनेकांना मालमत्तेच्या मालकीसाठी मृत्यूचा दाखला हवा होता. एकीकडे पालकांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी मुलांना वेळ नव्हता, मात्र त्यांचा मृत्यू होताच संपत्ती हवी होती, असे पालघर येथील आनंद वृद्धाश्रमाच्या विश्वस्त मनीषा कोटक यांनी सांगितले.

दूरचित्र संवादाद्वारे संपर्क!

संसर्ग होण्याच्या भीतीमुळे ज्येष्ठांच्या बाहेर फिरण्यावर बंधने होती. नातेवाईकांशी केवळ दूरचित्र संवादाद्वारे संपर्क साधला जात होता. कार्यक्रमही ऑनलाईन घेत होतो. मात्र काही ज्येष्ठ नागरिक नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करीत होते. त्यांना सर्व काळजी घेऊन नातलगांना भेटू दिले जात होते. त्याचबरोबर आम्हीही कुटुंबासह याच ठिकाणी राहत असल्यामुळे ज्येष्ठांना नैराश्य आले नाही. त्यांचे लसीकरणही करून घेण्यात आले, असे गोराई येथील वानप्रस्थ वृद्धाश्रमाचे योगेश ठाकूर यांनी सांगितले.

कौटुंबिक छळातही वाढ :  या सर्वेक्षणानुसार ६२ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी करोना काळात छळाचे प्रकार वाढल्याचे सांगितले. यामध्ये ४५.६ टक्के ज्येष्ठांनी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे आणि २३.१ टक्के ज्येष्ठांनी मारहाण होत असल्याचे सांगितले. यात मुलगा छळ करीत असल्याचे ४३.८ टक्के ज्येष्ठांनी सांगितले. त्याखालोखाल सूनेकडून छळ होत असल्याचे २७.८ टक्के ज्येष्ठांनी, तर मुलीकडून छळ होत असल्याचे १४.२ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे. त्यामध्ये मानसिक, शारिरीक आणि आर्थिक अशा तिन्ही प्रकारचा छळ होत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले.

कुटुंबीय म्हणतात.. या सर्वेक्षणादरम्यान कुटुंबात ज्येष्ठांची काळजी वाहणाऱ्यांशीही संवाद साधण्यात आला. घरातून काम, ऑनलाइन शिक्षण यामुळे वाढलेल्या घरातील आवाजाचा त्रास ज्येष्ठांना होत असल्याचे ६६.७ टक्के  लोकांनी सांगितले. ज्येष्ठांना येणाऱ्या खर्चाचे आव्हान असल्याचे २८ टक्के  लोकांनी नमूद केले.