प्रार्थनेसाठी गर्दी न करण्याचे आवाहन

मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईतील धार्मिक स्थळे पुढील काही दिवस नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी प्रार्थनेसाठी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आर्चबिशप यांनी रविवारच्या प्रार्थनेला येण्याची सक्ती हटवून ही प्रार्थना सर्वसामान्य भक्तांना ऐच्छिक केली आहे. या प्रार्थनेत ६० वर्षांंवरील ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊ नये असे आवाहन आर्चबिशप यांच्याकडून करण्यात आले आहे.

करोनाचा जगभरात वेगाने प्रसार होत असल्याने त्याला रोखण्यासाठी कडक उपाययोजना सरकारकडून राबविल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून धार्मिकस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच काही धार्मिक स्थळे बंद केली आहेत.  आर्चबिशप यांनीही नागरिकांना कुटुंबासह घरातच प्रार्थना करावी असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर माहिम येथील सेंट मिशेल चर्चने बुधवारी होणारी ‘नोवेना’ सेवा ही १ एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे.

मंदिरे बंद

दादर येथील कबुतरखाना परिसरातील हनुमान मंदिरासह या परिसरातील इतर मंदिरेही बुधवारपासून भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत.  ३१ मार्चनंतरच ही धार्मिक स्थळे पुर्ववत खुली केली जातील. श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा ही ३१ मार्च २०२० पर्यंत बंद राहिल असे पालखीचे मुख्य संयोजक व विश्वस्त संतोष भोसले यांनी सांगितले आहे. मुंबई शहर व उपनगरातील काही विभागात येणारी पालखी ठाण्यातील ढोकाळी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात थांबविण्यात आली आहे.   श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने दैनंदिन दोन वेळचा स्वामी भक्तांकरिता देण्यात येणारा महाप्रसाद ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.