भाजपशी काडीमोड झाल्यानंतर ठाणे जिल्ह्य़ातील बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याचे बेत आखणाऱ्या शिवसेनेला स्वपक्षातील बंडोबांना आवरण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. काल-परवा पक्षात आलेल्या आयारामांना उमेदवारी देण्याचा धडाका सेनानेतृत्वाने लावल्याने नाराजांना टिपण्याची रणनीती भाजपच्या चाणक्यांनी आखल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्य़ात शिवसेनेच्या तुलनेत भाजपची अवस्था अगदीच तोळामासा आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात उमेदवारी मिळवताना भाजपची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे शिवसेनेतील असंतुष्टांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. नवी मुंबई, वसई-विरार आणि मीरा-भाईंदरसारखे काही अपवाद वगळले तर ठाणे आणि पालघर अशा दोन्ही जिल्ह्य़ांत वरचष्मा राखण्याची यंदा शिवसेनेला चांगली संधी आहे. तुलनेने भारतीय जनता पक्षाची या जिल्ह्य़ांमधील अवस्था तोळामासा असली तरी कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यामुळे ग्रामीण पट्टयात भाजपला उमेदवार मिळू शकेल. ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील शिवसेनेच्या यादीवर आमदार एकनाथ िशदे यांचा प्रभाव अगदी स्पष्टपणे जाणवत असला तरी अनेकांना उमेदवारीसाठी ‘शब्द’ देण्याच्या फंदात पक्षात नवा घोळ उभा रहाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कल्याण ग्रामीण..
ठाणे पालिका निवडणुकीत पराभूत झालेले सुभाष भोईर यांना कल्याण ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर झाल्याने येथे बंडाची चिन्हे दिसू लागली आहेत. येथील इच्छुक रमेश म्हात्रे भाजपच्या संपर्कात असल्याच्या वृत्तामुळे त्यांना थोपवण्यासाठी शिवसेनेत पळापळ सुरू आहे.
कल्याण पूर्व..
येथील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांना पक्षात घेण्यावरून सुरू असलेला घोळ संपला नसल्याने येथून गोपाळ लांडगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे गायकवाडांची पावले भाजपच्या दिशेने पडू लागली असून त्यांच्या शिवसेनाप्रवेशासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.
कळवा-मुंब्रा.. : अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत आलेल्या दशरथ पाटील यांना कळवा-मुंब्रातून उमेदवारी जाहीर करून पक्षाने जुन्या शिवसैनिकांची नाराजी ओढवून घेतली आहे.
ठाणे शहर : या मतदारसंघात रवींद्र फाटक यांच्या उमेदवारीवरून नाराजीनाटय़ रंगण्याची चिन्हे आहेत.
नवी मुंबई : उमेदवारी अखेपर्यंत तंगविल्याने नाराज झालेल्या विजय चौगुले यांच्यावर भाजपने गळ टाकला होता. मात्र, खासदार राजन विचारे यांनी ‘मातोश्री’वारी घडवून त्यांचे बंड थंड केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
ठाण्यात शिवसेनेमध्ये नाराजी
भाजपशी काडीमोड झाल्यानंतर ठाणे जिल्ह्य़ातील बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याचे बेत आखणाऱ्या शिवसेनेला स्वपक्षातील बंडोबांना आवरण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.

First published on: 27-09-2014 at 05:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reluctant in thane shiv sena