भारतीय राज्यघटनेतील आरक्षणाचा फायदा घेऊन दलितांमध्ये एक मोठा मध्यमवर्ग तयार झाला आहे, त्याला सामाजिक प्रश्नाचे काही देणेघेणे नाही, त्यामुळेच दलित चळवळीला आज मरगळ आली आहे, अशी टीका दलित पँथरचे अध्यक्ष नामदेव ढसाळ यांनी केली. दलित पँथर धर्माच्या प्रश्नावर फुटली, धर्मातरामुळे दलितांचे भौतिक प्रश्न सुटत नाहीत, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
देशात एक झंझावात निर्माण करणाऱ्या दलित पॅँथरच्या स्थापनेला येत्या ९ जुलैला ४१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पँथरच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ढसाळ यांनी गेल्या ४१ वर्षांतील दलित चळवळीच्या यशापयशाचा आपल्या खास शैलीत आढावा घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. दलितांमधील चार पिढय़ा आरक्षणाचा फायदा घेत आहेत. शिक्षण मिळाले, सरकारी मोठमोठय़ा हुद्दय़ाच्या नोकऱ्या मिळाल्या. त्यातून दलितांमधील एक मोठा मध्यमवर्ग तयार
झाला.
सुरुवातीच्या दोन पिढय़ांपर्यंत सामाजिक बांधीलकी होती, त्यानंतरच्या पिढीला त्याचे भान राहिले नाही. मध्यमवर्गीय दलित आपल्या प्रपंचात अडकून पडला आहे. चळवळीत भाग घेतला तर आपली नोकरी जाईल की काय, अशी त्याला भीती वाटते आहे. तो आत्मकेंद्रित झाला आहे, त्याचा फटका चळवळीला बसला आहे, असे त्यांनी सांगितले.
दलित पँथरच्या झेंडय़ाखाली सर्व अस्पृश्य समाजातील तरुण संघटित होऊ पाहत होता,  परंतु राजा ढाले यांच्या जो बुद्घिस्ट तो पँथर या भूमिकेमुळे त्याला सुरुंग लागला, असा आरोप त्यांनी केला. बाबासाहेबांनी हिंदूू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्या वेळी बहुतांश पूर्वाश्रमीच्या महार समाजाने धर्मातर केले होते.
बाकीचा अस्पृश्य वर्ग हिंदूूच होता. धर्मातरामुळे सगळेच प्रश्न सुटत नाहीत. धर्मातरापेक्षा भौतिक प्रश्न सोडविण्याला महत्त्व दिले पाहिजे होते. मात्र त्या मुद्दय़ावर वाद झाला आणि पँथरमध्ये फूट पडल्याचे ढसाळ म्हणाले. पँथरच्या वर्धापनदिनानिमित्त ९ जुलैला मुंबईत मेळावा आणि बेकारीच्या प्रश्नावर जनआंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  
पँथर ही अपयशाची गाथा
मी आणि माझ्या पिढीतील लोक समर्पित भावनेने दलित चळवळीत आलो. पँथरची चळवळ सुरू झाली त्या वेळी माझे वय २५ होते, आज मी ६५ वर्षांचा आहे. दलित पँथरला ४१ वर्षे झाली. परंतु अंतर्गत कलहामुळे आम्ही फार काही राजकीय यश मिळवू शकलो नाही. पँथर चळवळ ही अपयशाची गाथाच ठरली, अशी खंत नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केली.