|| रेश्मा शिवडेकर
अत्याधुनिक सुविधांची निर्मिती
मुंबई : गोरेगावच्या ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’त (फिल्मसिटी) मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी सध्या उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालून अमेरिकेतील ‘युनिव्हर्सल’ किंवा लंडनमधील ‘पायोनिअर’च्या धर्तीवर विकास करण्याची प्रक्रि या प्रगतीपथावर आहे. याकरिता दोन महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या ‘स्वारस्य निविदे’ला (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) १७ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मुंबईतील चित्रपट व्यावसायिकांकरिता आपल्या राज्यात पायघड्या पसरल्या जातील, असे आश्वासन मुंबईत येऊन दिले होते. नोईडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रपटनगरी तयार करण्याच्या प्रयत्नांनाही उत्तर प्रदेश सरकारने सुरुवात केली आहे.

मुंबईत उभा राहिलेला मनोरंजन उद्योग (बॉलीवूड) टिकवण्याकरिता राज्य सरकार काय करणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली. पाठोपाठ गोरेगावच्या चित्रनगरीच्या विकासाची योजना आखून राज्य सरकार हा उद्योग टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा संदेश दिला गेला.

पहिल्या टप्प्यात इथल्या २२१ एकरपैकी २३ एकर जागेचा विकास केला जाणार आहे. त्याकरिता १७ कंपन्यांनी रस दाखविल्याचे ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’च्या कार्यकारी संचालक मनीषा वर्मा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

गोरेगावच्या चित्रनगरीच्या विकासाची प्रक्रि या प्रगतीपथावर असली तरी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात विखुरलेल्या संपूर्ण मनोरंजन उद्योगाला सामावून घेण्याची या चित्रनगरीची क्षमता मर्यादित आहे. १९७७ साली त्या वेळच्या राज्यातील राजकीय नेतृत्वाने दूरदृष्टी दाखवून या उद्योगाकरिता पायाभूत सुविधा उभ्या राहाव्या  म्हणून गोरेगावची चित्रनगरी वसवली. सध्या मनोरंजन क्षेत्रातून मिळणाऱ्या एकू ण उत्पन्नापैकी ४० हजार कोटींचे उत्पन्न के वळ मुंबईतून मिळते. मुंबईचा हा चेहरा टिकवून ठेवायचा असेल तर के वळ गोरेगावच्या चित्रनगरीचा विकास करून भागणार नाही. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात विखुरलेल्या या क्षेत्राला एका छत्राखाली आणणाऱ्या ‘प्रतिचित्रनगरी’ची गरज मुंबईला असल्याची प्रतिक्रि या निर्माते नितीन वैद्य यांनी व्यक्त के ली.

सध्या काय आहे?…गोरेगावमध्ये १९७७ साली ५२१ एकर जागेवर ही चित्रनगरी वसविण्यात आली. महामंडळाकडून चित्रनगरीचे व्यवस्थापन सांभाळले जाते. या ठिकाणी सध्या १६ वातानुकूलित स्टुडिओ, ९० मेकअप रूम, ४४ आऊटडोअर चित्रीकरण स्थळे, हेलिपॅड, तलाव, मंदिरे आदी व्यवस्था आहे. काही जागा व्हिसलिंग वूड या खासगी संस्थेला देण्यात आली आहे. उर्वरित २२१ एकर जागेचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यातील २३ एकर जागेचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकासासाठी २८ जूनला महामंडळाने स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. त्यानंतर निविदा प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.

होणार काय?… चित्रपटांच्या निर्मितीपूर्व आणि पश्चात लागणाऱ्या अंतर्गत व बाह्य चित्रीकरणे स्थळे, व्हीएफएक्स, डिजिटल अ‍ॅनिमेशन, साऊंड मिक्सिंग सर्व सुविधांबरोबरच चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगणारे संग्रहालय येथे उपलब्ध करण्यात येणार आहे. सुमारे ३२ स्टुडिओ या ठिकाणी उभे राहतील. थोडक्यात कोणत्याही चित्रपट, मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईबाहेर किंवा परदेशात जाण्याची गरज राहणार नाही.