मनुष्यबळ अपुरे; कीटकनाशक खात्याकडून घनकचरा व्यवस्थापन खात्याकडे जबाबदारी

प्रसाद रावकर

करोनाबाधित आणि करोना रुग्ण असलेले परिसर यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असले तरी या भागांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळाअभावी निर्जंतुकीकरण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. निर्जंतुकीकरणाची जबाबदारी असलेल्या कीटकनाशक खात्यावर पावसाळय़ापूर्वी डासांची उत्पत्तिस्थाने शोधून नष्ट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता निर्जंतुकीकरणाचे काम घनकचरा व्यवस्थापन खात्याकडे सोपवण्यात आले आहे. परिणामी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

करोनाबाधिताला उपचारासाठी नेल्यानंतर त्याचा वावर असलेल्या घरात, इमारतीत आणि आजूबाजूच्या परिसरात तात्काळ निर्जंतुकीकरण करण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून याला विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या, पालिके कडील अपुरे मनुष्यबळ, करोनाची बाधा आणि विलगीकरणातील कर्मचाऱ्यांची वाढती संख्या अशा विविध कारणांमुळे निर्जंतुकीकरणास विलंब होत आहे. त्यात निर्जंतुकीकरणाची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन खात्यावर सोपविण्यात आली आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी डासांची उत्पत्तिस्थाने शोधून कीटकनाशक खाते ती नष्ट करते. करोनामुळे निर्जंतुकीकरणाचे कामही खात्यावर आले. त्यामुळे डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर पालिका प्रशासनाने निर्जंतुकीकरणाचे काम या खात्याकडून काढून घेतले. ६ मेपासून या कामाची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन खात्यावर सोपविण्यात आली आहे. कीटकनाशक विभागाने ६ ते १८ मे या काळात टप्प्याटप्प्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे हे काम सुपूर्द केले. तत्पूर्वी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील संबंधितांना निर्जंतुकीकरणाबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या कामाचा अनुभव नसल्याने निर्जंतुकीकरणाचे काम रखडत असल्याचे सांगण्यात येते.

एक लाखाहून अधिक ठिकाणी निर्जंतुकीकरण

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बाधित रुग्ण सापडल्यानंतर त्याचे घर, इमारतीतील संयुक्त भागाचे, तसेच अलगीकरण, विलगीकरण कक्षांचे निर्जंतुकीकरण के ले जाते. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने १५ मार्च ते १६ मे या कालावधीत १,०८,२४० ठिकाणी निर्जंतुकीकरण केले आहे. यात सरकारी, निमसरकारी संस्थांच्या ४,२३९ इमारती, पालिकेच्या २,००३ इमारती, घरातील विलगीकरणाची ९,०३३ ठिकाणे, करोनाबाधित रुग्णांची १४,८५० घरे, संबंधित ६८,११५ ठिकाणांचा समावेश आहे. या जागांध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी तब्बल १४१८६.५९० लिटर सोडियम हायपोक्लाराइटचा वापर करण्यात आला आहे, तर सोडियम हायपोक्लाराइटप्रमाणेच ‘झुनो’चा वापर करून ४५ इमारती, ६३० ठिकाणे, १,४७,०१६ चौरस फूट क्षेत्रफळ इतकी जागा निर्जंतुक करण्यात आली. त्यासाठी ३२८.५०० लिटर ‘झुनो’चा वापर करण्यात आला.