दिवाळी पाच दिवसांवर असताना मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहेत. या निर्णयाचा फटका मुंबई आणि उपनगरातील कोटय़वधी रुपयांच्या उलाढालीला बसणार आहे. किरकोळ फटाके विक्रेत्यांबरोबरच हौसेने फटाके खरेदी केलेले ग्राहकही हवालदिल झाले आहेत.

इतर काही राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर महाराष्ट्रातही तसा विचार सुरू झाला. मात्र, त्याबाबतचा निर्णय दिवाळी तोंडावर येईपर्यंत रेंगाळला. गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाच्या बैठकीतही फटाके बंदीवर मंत्र्यांचे एकमत नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंदी न लादता फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.

कोणतेही निर्बंध नसल्याने ग्राहकांनी खरेदीही केली. पण करोना काळात वायूप्रदुषणामुळे श्वसन विकार बळावू नयेत म्हणून आता दिवाळी अवघ्या चार-पाच दिवसांवर असताना फटाके फोडण्यावर निर्बंध आले आहेत.

दिवाळी जवळ आल्यानंतर करोना संसर्गाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करीत अन्य वस्तूंच्या बाजारपेठा गेल्या दोन आठवडय़ांपासून गर्दीने फुलल्या आहेत. फटाके फोडण्यावर बंदी नसल्यामुळे फटाक्यांच्या किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने सजवली होती. मुंबई आणि महानगर प्रदेशातील सर्वच किरकोळ विक्रेत्यांसह हंगामानुसार वस्तू विकणाऱ्यांनी देखील घाऊक बाजारपेठेतून रविवापर्यंत फटाके  खरेदी केले. आता मुंबई महानगरपालिकेने फटाक्यांवर निर्बंध घातल्यामुळे मोठय़ा खरेदीदारांनी नोंदवलेली मागणी रद्द करण्यास सुरूवात केली आहे, असे विक्रेते संतोष गोलतकर यांनी सांगितले.

किरकोळ विक्रेत्यांना धग

जनजागृतीमुळे ग्राहकांचा फटाके खरेदीचा उत्साह कमी झाला आहे. कर्कश्य आवाज करणारे फटाके  ग्राहक टाळत आहेत. ग्राहकांचा कल पाहूनच घाऊक बाजारातून खरेदी केली जाते. उत्पादकांनी आपली उत्पादने केव्हाच घाऊक विक्रेत्यांना विकली आहेत. त्यापैकी ७० ते ८० टक्के फटाके किरकोळ बाजारात आले आहेत. त्यामुळे उत्पादक किंवा घाऊक विक्रेत्यांना या बंदीची झळ बसणार नाही. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ग्राहकांनाही फटका..

आतापर्यंत शहर, महानगर परिसरातील किरकोळ बाजारांमधून साधारण ३० ते ३५ टक्के विक्री झाली आहे. त्यामुळे निर्बंधाचा फटका बसण्याची चिंता विक्रेते नवीन छावडा यांनी व्यक्त केली, तर निर्बंधांमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांनाही नुकसान सोसावे लागेल, अशी खंत विक्रेते समीर देशमुख यांनी व्यक्त केली.

शोभेच्या फटाक्यांचा धूर अधिक

गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या दिवसांत ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत घट झाल्याचे दिसते. मात्र, फटाके फोडण्याच्या हौसेची जागा आवाजाच्या फटाक्यांऐवजी शोभेच्या फटाक्यांनी घेतली आहे. या फटाक्यांतून निघणाऱ्या धुराचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी झाले असले तरी वायू प्रदुषण वाढले आहे. गेल्यावर्षी मुंबईत दिवाळीदरम्यान पाऊस आणि वादळी वातावरण होते. त्यामुळे फटाके तुलनेने कमी फोडले गेले. परिणामी, पाच वर्षांत प्रदूषणात घट नोंदवण्यात आली. मात्र, त्यापूर्वीची दोन वर्षे मुंबईतील हवेची गुणवत्ता मोठय़ा प्रमाणावर खालावली होती. हवेतील सूक्ष्मकणांचे प्रमाण २००च्या पुढे होते.

निर्बंध होतेच, पालन कधी?

न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी वेळ निश्चित केली होती. ते बंधन गेल्यावर्षी पाळले गेले नाही. आता फटाक्यांची खरेदी झाल्यानंतर ते फोडण्यावर निर्बंध घातल्यामुळे तरी त्यांचे पालन होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र शहरातच्या प्रत्येक गल्लीबोळात, इमारतीच्या आवारात लक्ष ठेवण्याइतपत मनुष्यबळ पोलीस किंवा महापालिके कडे आहे का? असा प्रश्न विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये फक्त प्रदूषण कमी करणारे फटाके उडवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मग या शहरात प्रदूषण नको आणि इतर शहरांमध्ये ते झाले तरी चालेल का? असाही प्रश्न आहे.

कर्नाटक सरकार फटाक्यांवर संपूर्ण बंदी घालण्याच्या विचारात होते. परंतु तेथील सरकारने फटाकेविक्री आणि वापरास सशर्त परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील निकषांनुसार बनवलेले फटाके (ग्रीन क्रॅकर्स) विकण्यास, फोडण्यास कर्नाटकात परवानगी आहे.

–  पी. गणेशन, अध्यक्ष, फटाके उत्पादक संघटक