शुभम पालांडे अद्यापही बेपत्ता

बेपत्ता मुलाचा शोध अद्याप न लागल्याने मुलुंडच्या रिया पालांडे आत्महत्या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले आहे. बेपत्ता शुभम पालांडे याच्या शोधार्थ नवघर पोलिसांचे पथक सध्या त्याच्या नातेवाईक व मित्र परिवाराकडे चौकशी करीत आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी करण्यात आलेले पोलीस कुटुंब अटकपूर्व जामीन अर्ज करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली आहे.

किरणा मालाचे दुकान चालविणाऱ्या रिया (४७) यांनी गुरुवारी मुलुंड पूर्वेकडील समर्थ व्हिला इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या भिंतीवर त्यांनी भारती चौधरी यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे लिहिलेले पोलिसांना आढळले. सोबत दुकानात एक चिठ्ठी सापडली. त्यात भारती, त्यांचे पती दामोदर आणि कन्या यांची नावे होती. दामोदर मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभागात वरिष्ठ निरीक्षक आहेत. ३० लाखांच्या व्यवहारावरून चौधरी आणि रिया यांच्यात जुना वाद होता. या वादाचाही उल्लेख रिया यांनी मागे सोडलेल्या चिठ्ठीत पोलिसांना आढळला. त्या आधारे नवघर पोलिसांनी चौधरी कुटुंबाविरोधात गुन्हा नोंदविला.

शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडलेला शुभम अद्याप परतलेला नाही. त्याचा फोन बंद असल्याचे निदर्शनास आल्याने चिंताग्रस्त बहिणीने तशी तक्रार नावघर पोलीस ठाण्यात दिली. शुभमचा शोध सुरू असल्याचे परिमंडळ सातचे उपायुक्त अखिलेश सिंग यांनी सांगितले.

दुसरीकडे चौधरी कुटुंबाने रविवारी सुटीकालीन न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेतली. मात्र नियमित न्यायालयाकडे अर्ज करण्याच्या सूचना सुटीकालीन न्यायालयाने दिल्याने त्यांनी माघार घेतली, अशी माहिती नवघर पोलिसांना मिळाली आहे. अर्ज करण्यापूर्वी चौधरी कुटुंबाला अटक करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे पोलिसांनी सांगितले.