|| प्रसाद रावकर

माटुंग्यातील इंडियन जिमखान्यालगतचा रस्ता ; ‘सार्वजनिक’ करण्याच्या पालिका प्रशासनाच्या हालचाली

माटुंग्यातील इंडियन जिमखान्याला दिलेल्या मैदानाचा २० फूट भागाचा लचका तोडून लगतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. मैदानालगतचा रस्ता ‘सार्वजनिक रस्ता’ म्हणून घोषित करण्यासाठी पालिकेने प्रयत्न चालवले आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भाजप आग्रही आहे, तर शिवसेनेने याला विरोध केला आहे. त्यामुळे नवीन घडामोडींनंतर या दोन्ही पक्षांत पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या ८० वर्षांपासून माटुंगा येथे इंडियन जिमखाना आहे. या भूखंडाच्या चारही बाजूला इमारती असून मैदानाच्या सभोवताली ९ फूट रुंद रस्ता आहे. हा रस्ता रहिवासी आणि मैदानात खेळण्यास येणाऱ्यांना अपुरा पडत असल्याचे कारण पुढे करीत पालिकेने त्याचे विस्तारीकरण करण्याचा घाट घातला आहे. भविष्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर नव्या इमारतींमध्ये वास्तव्यास येणाऱ्या रहिवाशांना ९ फूट रस्ता अपुरा पडेल. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मैदानाचा २० फूट रुंदीचा भाग रस्त्यासाठी वापरण्याचा पालिकेचा मानस आहे. हा रस्ता सुमारे ४५ फूट रुंदीचा करण्याची योजना आहे.

सध्याचा रस्ता लहान असल्यामुळे तेथे टोलेजंग इमारतींना परवानगी मिळू शकत नाही. त्यामुळे काही इमारतींचा पुनर्विकास खोळंबला आहे. ही बाब लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर आपोआपच जुन्या इमारतींना उंच इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळू शकेल. त्यामुळेच हा घाट घालण्यात आल्याची कुजबूज या परिसरातील रहिवाशांमध्ये सुरू आहे.

उद्यानाचा प्रस्तावही बारगळला

पालिकेने माटुंगा येथील ११,२८४ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड १ जानेवारी १९३८ रोजी २५ वर्षांच्या कालावधीसाठी इंडियन जिमखान्याला भाडेपट्टय़ाने दिला होता. भाडेपट्टय़ाची मुदत १९६३ मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्याची विनंती जिमखान्याकडून करण्यात आली होती. मात्र या भूखंडावर मनोरंजन मैदान / सार्वजनिक उद्यानाचे आरक्षण असल्यामुळे तो उद्यान विभागातर्फे विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यामुळे भाडेपट्टय़ाच्या नूतनीकरणाचा विचार करण्यात आला नाही. तथापि, पालिका उद्यान विभागाला या ठिकाणी उद्यान विकसित करणे अशक्य झाल्यामुळे इंडियन जिमखाना संस्थेकडे या भूखंडाचा मासिक भाडेपट्टय़ाने ताबा कायम राहिला.

पार्किंगसाठी रुंदीकरण?

सध्या या मैदानाच्या एका बाजूला रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून विस्तारित रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे का, असा सवाल रहिवासी करीत आहेत.