रेल्वे पोलीस दलाच्या दोन हवलदारांच्या तत्परतेमुळे आज एका जणाचा प्राण वाचला. परळ रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. परळ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरुन लोकल सुटली होती. ती लोकल पकडण्यासाठी एका प्रवाशाने धाव घेतली. धाव घेता घेता त्या प्रवाशाचा तोल गेला आणि तो खाली पडला. प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर गाडीच्या वेगामुळे तो गाडीखाली येणार होता परंतु जवळच उभ्या असलेल्या एका काँस्टेबलने त्याला पटकन आपल्याकडे खेचले.

तितक्यात एक दुसरा काँस्टेबल त्याच्या मदतीसाठी धावला आणि दोघांनी त्याला बाहेर खेचले. त्यांच्या या तत्परतेमुळे आज त्याचे प्राण वाचले. जर काही क्षणांचाही विलंब झाला असता तर होत्याचे नव्हते झाले असते परंतु त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या प्रवाशाचे प्राण वाचले. धावत्या रेल्वेतून चढू किंवा उतरू नका असा सल्ला आम्ही वेळोवेळी देत असतो परंतु काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात असे एका अधिकाऱ्याने म्हटले. रेल्वे पुलाचा वापर न करता रेल्वे लाइन क्रॉस केल्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील देशात खूप आहे. तेव्हा रेल्वे विभागानी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.