आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत पृथ्वीराज चव्हाणच मुख्यमंत्रीपदी राहोत, जेणे करून त्यांच्या निष्क्रीय कारभाराचा महायुतीला निवडणुकीत फायदा होईल, अशी उपरोधी टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीबद्दल आठवले यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री निष्कलंक असले तरी, त्यांची  तीन वर्षांची कारकीर्द म्हणजे कोरी पाटी आहे. त्यांच्या निष्क्रीय कारभाराचा मागासवर्गीय समाजाला मोठा फटका बसला आहे. मागासवर्गीयांच्या कल्याणाचे १७०० कोटी रुपये खर्च झाले नाहीत. तीन वर्षांत दलितांवरील व माहिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. झोपडपट्टीवासियांचे हाल वाढले आहेत.गोरगरिबांच्या विकासाच्या योजनांच्या फायली धूळ खात आहेत. महागाई कमी करण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असे आरोप आठवले यांनी केले आहेत़