‘त्या’ पोलिसाला संसर्ग असल्याचे स्पष्ट

मुंबई : करोनासदृश लक्षणे असूनही नियमावर बोट ठेवत मृतदेहाची चाचणी करण्यास नकार दिलेल्या ‘त्या’ पोलिसाला करोना संसर्ग असल्याचे निदान केईएम रुग्णालयात शुक्रवारी झाले. करोना संशयिताच्या मृतदेहाच्या चाचण्या न करण्याचा राज्य सरकारचा नियम सदोष असल्याचे यावरून स्पष्ट होते.

अमली पदार्थविरोधी पथकात कार्यरत असलेल्या मंगेश कांबळे (४०) यांना करोना संसर्ग झाला होता, हे शुक्रवारी आलेल्या चाचणी अहवालात स्पष्ट झाले. कांबळे यांना करोनासदृश लक्षणे असूनही, मृतदेहाची चाचणी न करण्याचा नियम पुढे करत त्यांच्या मृतदेहाची चाचणी करण्यास रुग्णालयाने आधी नकार दिला होता. तसेच त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचेही मृत्यू अहवालात नमूद केले होते. त्यांच्या पत्नीची करोना चाचणी होकारात्मक आली, तरीही त्यांच्या मृतदेहाची चाचणी करण्याचे रुग्णालयाने आधी नाकारले होते.

‘करोना संशयित मृतांची चाचणी होत नसल्याने धोका’ हे वृत्त ‘लोकसत्ता’ने २ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर गुरुवारी कांबळे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण हृदयविकाराचा धक्का असल्याचे दिसून आलेले नाही. नमुने अधिक तपासासाठी पाठविण्यात आल्याचे समजते.

शवविच्छेदन केल्याने संसर्ग प्रसाराचा धोका अधिक असल्याने कांबळे यांचा मृतदेह कुटुंबीयाच्या ताब्यात न देता त्याची रुग्णालयामार्फतच विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

करोना संशयित मृतांच्या चाचण्या न करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणामुळे संसर्ग प्रसाराचा धोका सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

‘हा तर करोनायोद्धय़ांवर अन्याय’

‘‘कांबळे यांच्या पत्नीची चाचणी केली नसती, तर हा मृतदेह आम्ही तसाच ताब्यात घेतला असता. यातून किती जणांना संसर्ग झाला असता याचा विचार प्रशासनाने केला नाही. कांबळे यांच्या मृतदेहाची चाचणी झाली नसती तर त्यांच्या पश्चात पत्नीला आर्थिक मदतही मिळाली नसती. मृत्यूनंतर करोनायोद्धय़ाला आणि त्याच्या कुटुंबाला दिलेली वागणूक अन्यायकारक आहे,’’ असे मत कांबळे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले आहे.