तब्बल १५ वर्षे विरोधात बसलेल्या शिवसेना-भाजपच्या सदस्यांची सवय सत्ताधारी झाल्यानंतरही बहुधा गेलेली नाही हे चित्र बुधवारी विधानसभेत बघायला मिळाले. अध्यक्षांसमोरील जागेत जमून घोषणाबाजी, कागद फाडणे असा गोंधळ घालून सत्ताधारी आमदारांनीच कामकाज बंद पाडले. भाजप मंत्र्यांच्या विरोधात झालेल्या आरोपांवरील चर्चा टाळण्याच्या उद्देशानेच ही खेळी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
विधानसभेचे अधिवेशन संपण्यास तीन दिवस शिल्लक असताना मंत्र्यांच्या विरोधात झालेल्या आरोपांवर सभागृहात चर्चा झालेली नाही. याचे पडसाद आज उमटणार हे लक्षात आल्याने याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती द्यावी म्हणून काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करीत शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी कमालीचा गोंधळ घातला. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेताच भाजपनेही त्याला साथ दिली. या गोंधळात चार विधेयके चर्चेविना मंजूर करण्यात आली. गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर या शिवसेना आमदारांनी याकूबच्या समर्थनार्थ पत्र लिहिणाऱ्या काँग्रेस आमदारांचा उल्लेख देशद्रोही व गद्दार असा केला. याकूब मेमन आणि त्याचे समर्थन करणारा  चित्रपट अभिनेता सलमान खान यांची छायाचित्रे असलेल्या पोस्टर्सवर शिवसेनेच्या एका आमदाराने तर पायातील चप्पल काढून मारा केला. शिवसेनेचे आमदार सभागृहात कमालीचे आक्रमक झाले होते. याकूबच्या फाशीच्या मुद्दय़ावर धार्मिक रंग देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न शिवसेनेने केला. अधिवेशनाचा कालावधी संपत आला तरी मंत्र्यांवरील आरोपांवरून सभागृहात चर्चा होत नसल्याने वेगळी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीने विधानसभेत थोडीशी नरमाईचीच भूमिका घेतली आहे. काँग्रेसमध्ये गोंधळ बघायला मिळतो.

आमदारांच्या पत्रामुळे काँग्रेसची पंचाईत
काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांच्या पत्राचा आधार घेत शिवसेना आणि भाजपने दिवस गाजविला. हे पत्र पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेताच लिहिण्यात आले होते. मुस्लिम बहुल भागांमध्ये काही पक्ष व संघटनांनी काँग्रेस आमदारांच्या विरोधात वातावरण तापविण्यास सुरुवात केली होती. यामुळे या आमदारांना पत्र लिहिणे भाग पडल्याचे सांगण्यात आले. भाजपचे खासदार शत्रूघ्न सिन्हा यांनीही शिक्षा माफ करण्याकरिता पत्र लिहिले आहे याकडे नसिम खान, अमिन पटेल आणि आस्लम शेख या काँग्रेस आमदारांनी लक्ष वेधले.