ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचा नातू आणि रिपब्लिकन पँथर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी सोमवारी अचानक विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत निदर्शने केल्याने सुरक्षारक्षकांची एकच तारांबळ उडाली. ‘मनुवाद मुर्दाबाद, ब्राह्मणवाद मुर्दाबाद’च्या घोषणा देत आमदारांच्या अंगावर पत्रके फेकणाऱ्या खरात यांना सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले आहे.

विधानसभेत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भाप्रमाणेच मराठवाडाही महाराष्ट्रापासून वेगळा करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ सुरू झाल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्या वेळी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये घोषणाबाजी सुरू  होती. कामकाज संपताच प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या सचिन खरात यांनी अचानक घोषणाबाजी करीत हातातील पत्रके सदनातील आमदारांच्या दिशेने फेकली. ‘मनुवाद मुर्दाबाद, ब्राह्मणवाद मुर्दाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेकरांचा विजय असो’ अशा घोषणा देत निदर्शने केली.