रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर, सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने या मुद्यावरून राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाय, अगदी गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून राज्यातील भाजपा प्रवक्त्यांपर्यंत सर्वांनीच या कारवाईचा निषेध नोंदवत, महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.

सचिन सावंत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या व आमदार राम कदम यांच्यावर टीका केली आहे. ”सुशांत सिंहबद्दलची भावना भाजपा नेत्यांना दिवंगत अन्वय नाईक यांच्या बद्दल का वाटत नाही? मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या भाजपा नेते इतके विरोधात का? महाराष्ट्रातील मायलेकींना न्याय मिळाला याचे किरीट सोमय्या, राम कदम यांना दुःख झाले. महाराष्ट्राची १३ कोटी जनता माफ करणार नाही.” असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केली जात असल्याचा भाजपाकडून आरोप करण्यात आलेला आहे. ठाकरे सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला होता. तर, आमदार राम कदम हे देखील अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी मंत्रालय परिसरात उपोषणास बसले होते. शिवाय, घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्तानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत ते पदयात्रा करणार आहेत. अर्णब यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचंही कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अर्णब यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय उद्या (सोमवार) निर्णय देणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आता उद्या होणार आहे. जर उद्याही त्यांना जामीन मिळाला नाही तर अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं आहेत.