News Flash

सचिन वाझेंची अजून काहीतरी मोठं करण्याची योजना होती! – एनआयए

सचिन वाझे प्रकरणामध्ये एनआयएमधील सूत्रांनी नवा दावा केला असून त्यातून या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन वाझे (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)

सचिन वाझे प्रकरणातून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. आज NIA च्या विशेष न्यायालयाने सचिन वाझेंना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मात्र, आता एक नवी माहिती समोर आली आहे. अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवल्यानंतर देखील सचिन वाझे अजून काहीतरी मोठं करण्याचं नियोजन करत होते, अशी माहिती एएनआयनं एनआयएतील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात नुकतीच एनआयएनं सचिन वाझेंचे सहकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी ओळख असलेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली आहे. सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची चौकशी करण्यात आली आहे.

 

सचिन वाझेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझेंची सध्या एनआयएकडून चौकशी सुरू आहे. आजपर्यंत सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत होते. मात्र, आज त्यांची कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांची २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यासोबतच विशेष एनआयए न्यायालयाने एनआयएकडे असलेली कागदपत्र हाताळण्याची परवानगी सीबीआयला दिली आहे. सीबीआय सध्या परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करत असून अनिल देशमुखांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

 

प्रदीप शर्मा यांचाही सहभाग?

मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटकं ठेवल्यानंतर देखील सचिन वाझे अजून काहीतरी मोठं नियोजन करत होते. प्रदीप शर्मा यांनी या सगळ्या प्रकरणात सचिन वाझे यांना मदत तर केली नाही ना, याची सध्या एनआयए चौकशी करत आहे. याशिवाय परमबीर सिंह यांच देखील एनआयएनं स्टेटमेंट नोंदवून घेतलं आहे. मात्र, ते साक्षीदार म्हणून नोंदवून घेतलं असून संशयित म्हणून नाही”, अशी माहिती एएनआयनं दिली आहे.

परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राच्या माध्यमातून आरोप केले. त्यावर बरंच राजकारण झाल्यानंतर अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता सचिन वाझे यांनी देखील एक पत्र एनआयएच्या कोठडीत असताना एनआयएला लिहिलं आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्यासोबतच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि अजित पवार यांच्याशी संबंधित एका व्यक्तीवर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे सचिन वाझे यांच्या पत्रावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 5:10 pm

Web Title: sachin vaze mumbai police suspended officer planning something big says nia pmw 88
Next Stories
1 रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईच्या ‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद
2 महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन?; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
3 मुंबईत ‘रेमडेसिवीर’चा काळा बाजार, मेडिकलमधून पोलिसांनी जप्त केले २५० पेक्षा जास्त इंजेक्शन
Just Now!
X