‘फॅशन’ हा शब्द बॉलीवूड अभिनेत्रींसाठी आता परवलीचा झाला आहे. साठच्या दशकात मात्र जेव्हा साधना शिवदासानी नामक तरूणीने हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा श्री गणेशा केला तेव्हा नायिकेच्या फॅ शनविषयी कोणी विचार करत नव्हते. तत्कालीन हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्नप्रमाणे केसांच्या बटा कपाळावर रुळवण्याची फॅ शन साधना यांनी आपलीशी केली आणि त्यांच्या तमाम चाहत्यांमध्ये ‘साधना कट’ या नावाने ही केशभूषा प्रचलित झाली. नायिकांसाठी घट्ट चुडीदार-कुर्ता हीसुध्दा साधना यांनीच रुढ केलेली फॅ शन मानली जाते. या फॅशन रूपेरी पडद्यावरून नंतर समाजातही सहजतेने पाझरल्या.
अभिनेत्री साधनाचे नाव घेतले तरी कित्येकांच्या नजरेसमोर ‘मेरे मेहबूब’ चित्रपटातील नायक राजेंद्रकुमारकडे बुरख्याआडून पाहणारे बोलके डोळे उभे राहतात. या चित्रपटात पहिल्यांदाच नायक राजेंद्रकुमार यांची नायिकेशी गाठ पडते तेव्हा साधनाजींचे बोलके डोळे त्यांचा आणि पर्यायाने प्रेक्षकांच्याही काळजाचा ठाव घेतात. हेच बोलके डोळे साधना यांचे अस्त्र होते.
फॅशनच्या बाबतीत रुपेरी पडद्यावर अग्रणी ठरलेल्या या अभिनेत्रीचे आजवरचे जीवन मात्र साधे, सरळमार्गी असेच राहिले होते. पती दिग्दर्शक आर. के. नय्यर यांचे १९९५ मध्ये आजाराने निधन झाल्यानंतर साधना एकटय़ाच राहत होत्या. नायिका म्हणून चाहत्यांच्या मनात असलेली आपली रूपेरी पडद्यावरची सुंदर छबी कायम रहावी, यासाठी चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतल्यानंतर त्या कायम प्रसिद्धी माध्यमांपासून आग्रहाने दूर राहिल्या. आपली चुलत बहीण बबिता यांच्याशीही त्यांनी संपर्क ठेवला नव्हता मात्र, त्यांच्या समकालीन अभिनेत्री वहिदा रेहमान, हेलन, आशा पारेख आणि नंदा यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. शुक्रवारी सकाळी साधना यांच्या निधनाचे वृत्त समजताच अभिनेत्री वहिदा रेहमान आणि हेलन यांनी सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
‘लव्ह इन सिमला’ आणि ‘परख’ या दोन चित्रपटांनंतर ‘असली नकली’, ‘एक मुसाफिर एक हसीना’, ‘मेरे मेहबूब’ सारखे चित्रपट त्यांनी केले. १९६३ साली प्रदर्शित झालेला ‘मेरे मेहबूब’ही तिकीटबारीवरचा ब्लॉकबस्टर चित्रपट मानला जातो. १९६४ साली मनोज कुमारबरोबरचा त्यांचा ‘वो कौन थी’ हा रहस्यमय चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘मेरा साया’, ‘अनिता’ अशा रहस्यमय चित्रपटांमधून काम केल्यानंतर त्यांना ‘मिस्ट्री गर्ल’ अशी नवी ओळख मिळाली होती. यश चोप्रांचा ‘वक्त’ हाही त्यांच्या कारकिर्दीतील एक वेगळा चित्रपट ठरला. याच चित्रपटातून त्यांनी घट्ट कुर्ता-चुडीदार पंजाबी ड्रेस परिधान करण्याचा पायंडा पाडला. १९७२ साली आलेल्या ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शनही केले होते. कारकीर्द ऐन भरात असतानाच त्यांना आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर बोस्टन येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतरही साधना यांनी ‘एक फूल दो माली’, ‘इन्तकाम’, ‘आप आए बहार आयी’ सारख्या चित्रपटांमधून काम केले होते. त्यानंतर त्यांना नेत्रविकार जडला होता आणि गेली अनेक वर्षे त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. कित्येक वर्षांच्या खंडानंतर, २०१४ साली झालेल्या शायना एन. सी. यांच्या फॅ शन शोमध्ये साधना खास पाहुण्या म्हणून रॅम्प वॉकवर अवतरल्या होत्या.

देव आनंद यांची भविष्यवाणी
साधना खूप सुंदर आहे आणि भविष्यात ती एक मोठी अभिनेत्री होईल, अशी भविष्यवाणी देव आनंद यांनी केली होती. देव आनंद यांचे वक्तव्य ऐकून त्यावेळी साधनाजींना अमाप आनंद झाला होता. १९६० साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह इन सिमला’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट तिकीटबारीवर कमालीचा यशस्वी ठरल्यामुळे त्यांची अभिनेत्री म्हणून घोडदौड सुरू झाली. याच चित्रपटातील साधना यांचा अभिनय पाहून भारावलेल्या देव आनंद यांनी त्यांची ‘हम दोनो’ या चित्रपटात नायिका म्हणून त्यांची निवड केली.

Aai kuthe kay karte fame actress akshaya gurav replace sana sayyad palki in kundali bhagya
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार लोकप्रिय हिंदी मालिकेत, साकारणार प्रमुख भूमिका!
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
mai tumhe barbad kar dungi meme actress
लोकप्रिय गाणी व ‘राज’ सिनेमात इंटिमेट सीनमुळे राहिली चर्चेत; ‘या’ व्हायरल मीममधील अभिनेत्री अचानक गायब झाली अन्…

नूतन आदर्श
बिमल रॉय यांचा ‘परख’ हा आपल्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिका असलेला चित्रपट होता, असे साधनाजी सांगत. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी अभिनेत्री नूतन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. नूतन यांच्या अभिनयाचा आपल्यावर खूप प्रभाव होता, असेही साधनाजींनी सांगितले होते.
माझी आवडती अभिनेत्री साधना यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. साधनाजी मोठय़ा कलाकार होत्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
– लता मंगेशकर

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा दु:खाचा दिवस आहे. साधनाजी तुम्ही तुमच्या सौंदर्याने, बुद्धिमत्तेने, सळसळत्या ऊर्जेने आमचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद. चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून तुमची आठवण कायम राहील. मी तुमचा मोठा चाहता आहे आणि यापुढेही राहीन.
आमिर खान</strong>

साधनाजींचे सौंदर्य, त्यांचा बाज, त्यांच्या संयत अभिनयाचा वारसा यापुढेही कायम राहील.
करण जोहर</strong>