बहुचर्चित हिट अॅंड रन प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खान याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द करीत त्याची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्यांअभावी सलमान खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षाने न्यायालयात दाखल केलेल्या पुराव्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांनी हा निकाल दिला. निकालावेळी सलमान खान न्यायालयात उपस्थित होता.
गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयाकडून या प्रकरणी अंतिम निकालापूर्वीची निरीक्षणे नोंदविण्यात येत होती. त्यामध्ये या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आणि सलमान खानचा तत्कालीन अंगरक्षक दिवंगत रवींद पाटील याची साक्ष लावण्यात आलेल्या आरोपांसंदर्भातील कायद्यातील तरतुदींनुसार ग्राह्य धरता येणार नाही, असे न्यायालायने म्हटले होते. रवींद्र पाटील याचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. पण मृत्यूआधी सलमानप्रकरणी न्यायालयात त्याने साक्ष नोंदवली होती. यामध्ये सलमान खान मद्यप्राशन करुन गाडी चालवत असल्याची माहिती पाटील याने दिली होती. पण, आता त्यावर न्यायालायने वेगळे निरीक्षण नोंदविले. त्याचबरोबर सलमान खानच्या गाडीचा अपघात होण्यापूर्वी टायर फुटला की अपघातानंतर फुटला, याबद्दलही न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. सरकारी पक्षाने टायर फुटण्याचा तांत्रिक अहवाल त्यावेळी घ्यायला हवा होता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा प्रवास..

गुरुवारी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यावर न्यायालयाने सलमान खानला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याचे वकील अमित देसाई यांनी सलमान खान दीड वाजेपर्यंत न्यायालयात उपस्थित राहिल, असे सांगितले. सलमानवर जे आरोप लावण्यात आले आहेत. ते न्यायालयात सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला असल्याचे न्यायालयाने निकाल देण्यापूर्वीच स्पष्ट केले. दुपारी दीड वाजता सलमान न्यायालयात उपस्थित राहिल्यानंतर न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली जात असल्याचे स्पष्ट केले.

काय आहे हिट अॅंड रन प्रकरण
२८ सप्टेंबर २००२ रोजी घडलेल्या या घटनेमध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून सलमान खानने मुंबईतील अमेरिकन बेकरीनजीकच्या पदपथावर झोपलेल्या चारजणांना आपल्या गाडीने चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर अन्यांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले. या प्रकरणी १३ वर्षांपासून सत्र न्यायालयात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू होता. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.
सलमानने जबाब नोंदवताना अपघात आपल्या हातून नव्हे, तर चालक अशोक सिंग याच्या हातून घडल्याचा दावा केला होता. सलमानचा हा दावा सत्र न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावला. सलमानने गुन्हा केला नव्हता तर अपघात घडला त्या वेळेस त्याने घटनास्थळी जमलेल्या जमावाला चालकाविरुद्ध कारवाई करू, असे आश्वासित का केले नाही, त्याने पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची तक्रार का नोंदवली नाही, असे मुद्दे सत्र न्यायालयाने उपस्थित केले आहेत. एवढेच नव्हे, तर सलमानने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतल्याचे वा त्यांना वैद्यकीय मदत केल्याचे आणि पुन्हा पोलिसांसोबत घटनास्थळी आल्याचा कुठलाही पुरावा पुढे आलेला नाही, असेही सत्र न्यायालयाने नमूद केले होते.