समीर भुजबळांची उच्च न्यायालयाकडे विनंती

मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यासह अन्य आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मुख्य आरोपी असतानाही त्यांना जामीन देण्यात आला. त्यामुळे आपल्यालाही या प्रकरणी जामीन देण्यात यावा, अशी मागणी भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी मंगळवारी पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयाने त्यांना तातडीने दिलासा देण्यास नकार देत त्यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवडय़ात ठेवली आहे.

दोन आठवडय़ांपूर्वीच छगन भुजबळ यांना जामीन दिल्याच्या पाश्र्वभूमीवर समीर यांनीही जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या आठवडय़ातही त्यांच्या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयासमोर सुनावणी झाली. मात्र त्या वेळीही न्यायालयाने त्यांना तातडीने जामीन देण्यास नकार दिला होता.

न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्यासमोर मंगळवारी समीर यांच्या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी झाली. तसेच भुजबळ हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असतानाही त्यांना जामीन मिळालेला असताना आपल्यालाही जामीन देण्याची विनंती समीर यांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली. शिवाय तातडीने आपल्या याचिकेवर सुनावणी घेऊन निर्णय देण्याची विनंतीही करण्यात आली.

मात्र अन्य याचिकांवरही सुनावणी घ्यायची आहे, असे स्पष्ट करीत न्यायालयाने समीर यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवडय़ात ठेवली.