मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाटकाचा ‘वर्षां’वर मुहूर्त; ‘प्रशांत दामले फॅन्स क्लब’तर्फे पुन्हा रंगभूमीवर
‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाने दशकानुदशके मराठी मनावर अधिराज्य केले असून त्यातली गाणी, पदे आजही लोकांना भावतात, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगीत संशयकल्लोळ या १०० वर्षे झालेल्या नाटकाच्या मुहूर्ताप्रसंगी व्यक्त केल्या. ‘प्रशांत दामले फॅन्स क्लब’तर्फे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, ज्येष्ठ गायक रामदास कामत, अभिनेते प्रशांत दामले, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि नाटकातील अन्य कलाकार उपस्थित होते.
या नाटकाला एक वेगळे महत्त्व आहे. त्याचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावा, अशी आमची इच्छा होती. तसेच या नाटकाचे ताजेपण अजून टिकून आहे ही जमेची बाजू असून हा शंभर वर्षांपूर्वीचा फार्स पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येणार आहे. अशा भावना अभिनेते प्रशांत दामले यांनी या वेळी व्यक्त केल्या. निपुण धर्माधिकारी बोलताना म्हणाले, या नाटकाचा संकलन करणं हे खूप आव्हानात्मक होतं. या नाटकावर काम करताना आम्हाला भाषेचीदेखील काळजी घ्यावी लागली. गायक राहुल देशपांडे म्हणाले की, प्रशांत दामले यांच्याबरोबर काम करण्यास मिळणे ही स्वप्नवत बाब आहे. त्यांनी मला विचारल्यावर मी त्यांना होकार दिला. या वेळी या नाटकाच्या शुभारंभाप्रसंगी, प्रशांत दामले व राहुल देशपांडे यांनी नाटकातील छोटा प्रवेश सादर केला. या वेळी राहुल देशपांडे यांनी ‘मृगनयना रसिक मोहिनी’ व ‘घेई छंद मकरंद’ ही बहारदार गाणी सादर केली. या नाटकात यापूर्वीही काम केलेले ज्येष्ठ गायक रामदास कामत यांनीदेखील ‘हृदयी धरा’ हे पद सादर करून उपस्थितांची मने जिंकली.