संजय निरुपम यांच्या तक्रारीनंतर माघार

आरे वसाहतीमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याशी संबंधित संस्थेने उभारलेली व्यायामशाळा अनधिकृत असल्याची मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी लोकायुक्तांकडे केलेली तक्रार आणि लोकायुक्तांनी या संदर्भात जारी केलेली नोटीस या पाश्र्वभूमीवर वायकर यांच्या संस्थेने व्यायामशाळा सरकारकडे जमा केली आहे. निरुपम यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच  शिवसेनेचे राज्यमंत्री वायकर यांना सपशेल माघार घ्यावी लागली.

आरे वसाहतीमध्ये राज्यमंत्री वायकर यांच्या शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेने व्यायामशाळा बांधली होती. वायकर यांच्या आमदार निधीतून या शाळेचे बांधकाम करण्यात आले होते. वायकर   आमदार असताना हे बांधकाम करण्यात आले होते. अनधिकृत व्यायामशाळेच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरुपम यांनी आवाज उठविला होता. तसेच ही अनधिकृत व्यायामशाळा पाडून टाकण्याची मागणी केली होती. वायकर हे गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री असल्याने त्यांच्याकडे असलेल्या या खात्याने या व्यायामशाळेच्या बांधकामाचे समर्थन केले होते. या अनधिकृत व्यायामशाळेच्या विरोधात निरुपम यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. सध्या लोकायुक्तांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. लोकायुक्तांनी वायकर यांच्याशी संबंधित संस्थेला नोटीस बजाविली होती.

लोकायुक्तांकडे गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेचे पत्र सादर करण्यात आले. संस्थेने सर्व नियमांचे पालन करून ही व्यायामशाळा उभारली होती. पण काही जणांनी राजकीय हेतून जाणिवपूर्वक संस्थेला बदनाम करण्याची मोहीम हाती घेतली होती. यामुळेच व्यायामशाळेचे व्यवस्थापन आणि देखभालीचे काम संस्था यापुढे करणार नाही. तरी या व्यायामशाळेचे व्यवस्थापन आणि देखभालीचे काम हाती घ्यावे, असे पत्र संस्थेच्या वतीने मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाला देण्यात आले आहे. निरुपम यांच्या तक्रारीवरून वायकर यांच्याशी संबंधित संस्थेला माघार घ्यावी लागली.

सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याने वायकर यांच्या विरोधात आता कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निरुपम यांनी लोकायुक्तांकडे केली आहे. त्यावर ३ जुलैला सुनावणी होणार आहे. अनधिकृत बांधकाम केल्यानेच शिवसेनेच्या राज्यमंत्र्यावर माघार घेण्याची नामुष्की आल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.