पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले आहेत. या प्रकरणामध्ये वनमंत्र्यांचं नाव असून देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काहीही कारवाई करत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री डोळे मिटून गप्प बसलेले नाहीत, ते कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणाला पाठिशी घालणार नाहीत”, अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे.

“तपास पूर्ण होऊ द्या, मग बोला…”

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केल्यानंतर भाजपाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून अधिवेशन रोखून धरण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका विचारली असता त्यांनी वरील उत्तर दिले. “तुम्हाला काय वाटतं? राज्याचे मुख्यमंत्री शांतपणे बसले आहेत का? राज्यात कोण काय बोलतंय याकडे त्यांचं लक्ष आहे. ते जागरुक मुख्यमंत्री आहेत. त्यांचं प्रत्येक घडामोडीकडे लक्ष आहे. कोणत्याही गोष्टीचा तपास पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर बोला. मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणालाही पाठिशी घालणार नाहीत”, असं राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, राठोडांना फाडून खाल्लं असतं -चित्रा वाघ

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात २०१६मधल्या काही व्यवहारांमध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांचा तातडीने राजीनामा घेतला जावा, अशी मागणी केली होती. चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे चित्रा वाघ यांनी “माझा विरोध कमी करण्यासाठीच माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे”, असा आरोप केला आहे.