04 July 2020

News Flash

सांताक्रूझमध्ये स्कायवॉकला सरकते जिने

नागरिकांकडून अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी पालिकेचा निर्णय

‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) रेल्वे परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे स्थानकांना जोडून बांधलेल्या स्कायवॉकचा त्यांच्या उंचीमुळे फारसा वापर होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने पालिकेने सरकत्या जिन्यासह स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने सांताक्रूझमध्ये सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक बांधण्याचे ठरवले असून मंग़ळवारी या स्कायवॉकचे भूमिपूजन करण्यात आले. सांताक्रूझ पूर्वेला नेहरू रोड येथे हा स्कायवॉक होणार आहे. हा मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक असेल व त्यामुळे पादचाऱ्यांचा त्रास वाचणार आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधले असले तरी ते खूप उंचावर असल्याने त्याचे जिने चढून जाणे त्रासदायक ठरते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अपंगांना तर त्याचा वापरच करता येत नाही. एमएमआरडीएने बांधलेले हे स्कॉयवॉक आता पालिकेच्या ताब्यात आहेत. परंतु, कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेल्या या स्कायवॉकचा प्रवाशांकडून म्हणावा तसा वापर होत नाही.
रस्ता ओलांडताना अपघात होऊ नये तसेच पादचाऱ्यांना मोकळेपणी चालता यावे याकरिता पादचारी पूल, स्कायवॉक बांधलेले आहेत. परंतु, जिन्यांची चढउतार नको म्हणून पादचारी त्यांचा वापर करत नाहीत. अपंग, वृद्ध आणि व्हिल चेअरवरचे रुग्ण यांना स्कायवॉकचा उपयोगच नसतो. त्यामुळे पालिकेने यापुढे सर्वच पादचारी पूल, स्कायवॉक, भुयारी मार्गांवर सरकते जिने बसवण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून सांताक्रूझ येथे मुंबईतील पहिलावहिला सरकत्या जिन्याचा स्कायवॉक बांधण्यात येणार आहे. मंगळवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या स्कायवॉकचे भूमिपूजन करण्यात आले.

१८ महिन्यांनी सेवेत
सांताक्रूझ (पूर्व) येथे ‘एमएमआरडीए’ ने बांधलेल्या स्कायवॉकचा पूर्व दिशेकडे विस्तार करण्यात यावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. स्कायवॉकच्या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्व भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या स्कायवॉकची लांबी ५०० मीटर, रुंदी ४ मीटर असेल. या स्कायवॉकच्या बांधकामाचा एकूण खर्च २०कोटी १६ लाख ५७ हजार इतका आहे. पावसाळा सोडून १८ महिन्यांत या स्कायवॉकचे काम पूर्ण होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 8:58 am

Web Title: santacruz sky walk soon will connected through escalators jud 87
Next Stories
1 ‘भाजपकडून योग्यवेळी भूमिका’
2 स्थिर सरकार शक्य नसल्यानेच राष्ट्रपती राजवट
3 काही मुद्दय़ांवरील स्पष्टतेनंतरच शिवसेनेला पाठिंब्याचा विचार!
Just Now!
X