विद्यार्थ्यांकडून दुप्पट शुल्क आकारण्याच्या निर्णयाला चाप
दुप्पट शुल्क भरण्याची तयारी असलेल्या पन्नास टक्केमुलांनाच इंग्रजी पहिलीला प्रवेश देणाऱ्या दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिरची प्रवेशप्रक्रिया पालिकेने स्थगित केली आहे. शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत परवानगी मिळवण्याचा मुद्दा पुढे करत पन्नास टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश देऊन त्यांच्याकडून दुप्पट शुल्क आकारण्यास शाळेने सुरुवात केली. सोमवारी पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षांनी घेतलेल्या बैठकीत शाळेवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांनी महानगरपालिकेकडून रीतसर परवानगी घेणे २०१०पासून बंधनकारक करण्यात आले. मात्र दादरच्या प्रसिद्ध शारदाश्रम विद्यामंदिरकडून तब्बल सहा वर्षांनंतर म्हणजे २०१६ मध्ये परवानगीचा अर्ज आला. या कायद्याअंतर्गत प्रत्येक तुकडीमध्ये जास्तीत जास्त ४० विद्यार्थी घेणेच बंधनकारक आहे. शारदाश्रमच्या इंग्रजी प्राथमिक शाळेने पहिलीपासूनचे तीन तुकडय़ा असलेले वर्ग दाखवले होते. मात्र या शाळेकडून ज्युनिअर व सीनिअर केजीचे वर्गही चालवण्यात येत असून या वर्षी सीनिअर केजीमध्ये १७८ विद्यार्थी आहेत. आरटीई नियमानुसार २५ टक्के जागा वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असल्याने केवळ तीन तुकडय़ांमध्ये केवळ ९० विद्यार्थ्यांच्याच जागा असल्याचे शाळेकडून पालकांना सांगण्यात आले. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत पहिलीचे शुल्क २१ हजार होते. मात्र या शैक्षणिक वर्षांपासून पन्नास टक्केच जागा राहणार असल्याने शाळेने विद्यार्थ्यांचे शुल्क तब्बल ५१ हजार ५०० रुपये केले. काही पालकांनी हे शुल्क भरून प्रवेशही घेतले. मात्र, बहुतांश पालकांनी याबाबत तक्रारी केल्या. ‘प्रत्यक्षात दोन वर्षांनी शुल्कात १५ टक्के वाढ करण्याचा नियम आहे. मात्र शाळेचा हा मनमानी कारभार आम्ही पालिकेच्या निदर्शनास आणून दिला,’ असे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. सोमवारी शाळेच्या या प्रवेशप्रक्रियेबद्दल चर्चा करण्यासाठी शिक्षण समिती अध्यक्ष हेमांगी वरळीकर यांनी बैठक बोलावली.
या बैठकीला बोलावूनही शाळेचा प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. पालिकेने शाळेला विद्यार्थी संख्या कमी करण्यासाठी किंवा शुल्क वाढवण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन प्रवेशप्रक्रिया ताबडतोब थांबवण्याची नोटीस दिली,
अशी माहिती हेमांगी वरळीकर यांनी दिली.
शाळेकडे जागा नाही. दोन सत्रांत शाळा सुरू असते. त्यामुळे तुकडय़ा वाढवता येणार नसल्याने विद्यार्थी संख्या कमी केली आहे. पालिकेने नोटीस दिल्याने पुढील निर्णय होईपर्यंत प्रवेशप्रक्रिया बंद राहील, असे शाळेच्या समितीचे अध्यक्ष आसाराम पाटील यांनी लोकसत्ताला सांगितले.