मुंबई : शुल्कवसुलीला मनाई करणाऱ्या शासन आदेशाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर त्याचा लाभ उठवत शाळांनी शुल्क भरण्यासाठी पालकांवर दडपण आणण्यास सुरूवात केली आहे. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याच्या धमक्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांनी दिल्या आहेत.

टाळेबंदीच्या काळात शुल्क घेण्यास आणि यंदा शुल्कवाढ करण्यास शासनाने मनाई केली. त्यानंतर काही काळ शाळांच्या शुल्कवसुलीला चाप बसला. मात्र, शासनाच्या आदेशाला शिक्षणसंस्थांनी न्यायालयात आव्हान दिले. त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने शासनाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. त्याचा फायदा उठवत आता शाळांनी पालकांमागे शुल्कासाठी तगादा लावला आहे.

देशभर शाखा असलेल्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेने दहा दिवसांत शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली आहे. राज्यातील सर्व शाखांतील पालकांना याबाबतचे पत्र शाळेने पाठवले आहे. ‘या शैक्षणिक वर्षांसाठी शुल्क न भरलेल्या पालकांना आमच्या शाळेत पाल्यांना शिक्षण देण्यात रस नाही असे समजण्यात येईल. त्यानुसार १३ जुलैपासून आपल्या पाल्याच्या जागी नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. आपण अजूनही आपल्या मुलांना आमच्या शाळेत ठेवू इच्छित असाल तर ताबडतोब शुल्क भरण्यात यावे,’ अशा आशयाचे पत्र शाळेने दिले आहे.

ऑनलाइन वर्गात बसण्यासही मनाई..

शुल्क भरले नसल्याने नवी मुंबईतील एका शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाना बसण्यास मनाई केली. विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात समाविष्ट न करणे, सहभागी करून घेतल्यास त्यांचा अपमान करणे, त्यांना वर्गातून काढून टाकणे असे प्रकार शाळेकडून सुरू असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.