डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा ठरवणारे भाषण मागे घेण्याची मागणी

डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांच्या विरोधात वैज्ञानिकांनी ऑनलाइन मोहीम शनिवारपासून सुरू केली आहे. औरंगाबादमध्ये अखिल भारतीय वैदिक संमेलनामध्ये केलेले भाषण मागे घेण्याची आणि उत्क्रांतीचा सिद्धांत शिकविण्यासंदर्भातील सरकारचे धोरण स्पष्ट करण्याची मागणी वैज्ञानिकांनी या मोहिमेच्या माध्यमातून केली आहे. वैज्ञानिकांनी सुरू केलेल्या या ऑनलाइन मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत असून शनिवारी दिवसभरात तब्बल १०० वैज्ञानिकांनी पाठिंबा दिला आहे.

डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत पूर्णत: चुकीचा असून माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा उल्लेख विज्ञान आणि इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकायला हवा, असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी औरंगाबाद येथील अखिल भारतीय वैदिक संमेलनामध्ये शुक्रवारी केले होते. सत्यपाल सिंह यांच्या भाषणाचा तीव्र विरोध करत वैज्ञानिकांनी शनिवारपासून ऑनलाइन मोहीम सुरू केली. या मोहिमेमध्ये सत्यपाल सिंह यांना खुले पत्र लिहिले असून या पत्राचे समर्थन करण्यासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी होण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

उत्क्रांतीची मांडणी ३०-३५ वर्षांपूर्वीच वैज्ञानिकांनी नाकारली असल्याचा भाषणामध्ये करण्यात आलेला दावा फोल असून आत्तापर्यंतच्या संशोधनामधून सापडणारे पुरावे हे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला पुष्टी देणारे आहेत. उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये केवळ मानवाची उत्क्रांती असा मथितार्थ नसून निसर्गातील प्रत्येक सजीवाच्या उत्क्रांतीला सामावणारा सर्वसमावेशक अर्थ आहे. त्यामुळे माणसाच्या उत्क्रांतीबद्दलचे सिंह यांचे वक्तव्य हे उत्क्रांतीच्या सिद्धांताचा चुकीचा अर्थ काढणारे आहे. मानव आणि वानर यांच्यामध्ये सारखे गुणधर्म असणारे अनेक वैज्ञानिक पुरावे समोर आलेले आहेत, असे या पत्रामध्ये मांडण्यात आले आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे वेदामध्ये आहेत, हे वक्तव्यही अतिशयोक्ती असून याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, असेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

स्पष्टीकरण देण्याची मागणी

हे भाषण मागे घ्यावे आणि उत्क्रांतीचा सिद्धांत शिकविण्याबाबत सरकारने कोणते धोरण आखले आहे, याबाबतही स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.