‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत साथ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : करोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असून मुखपट्टी लावणे, सुरक्षित अंतर व हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करूनच करोनापासून सुरक्षित राहता येईल याचा पुनरुच्चार करत,  येत्या मंगळवारपासून राबविण्यात येणाऱ्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांनी योगदान दिल्यास करोना नियंत्रणाचे लक्ष्य साध्य करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला

ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यात १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात पथके नेमण्यात येणार असून ही पथके महिनाभरात किमान दोन वेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहेत. यात कुटुंबातील ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या कुणाला काही आरोग्याविषयी तक्रार असल्यास त्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढील उपचार देण्यात येणार आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

करोनाविरुद्धच्या लढय़ात स्वसंरक्षण महत्त्वाचे असून प्रत्येकाने आरोग्यविषयक छोटय़ा गोष्टींची काळजी घ्यायला हवी. बाहेर जाताना मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वारंवार हात धुणे, बंदिस्त जागेऐवजी हवा खेळती असणाऱ्या ठिकाणी थांबणे,  समोरासमोर न बसता अंतर राखणे, सार्वजनिक वाहतूक किंवा स्वच्छतागृहांचा वापर करताना काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यात पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ येऊ नये याकरिता सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे.

करोना संकटावर मात करण्यासाठी संसर्गाची साखळी तोडतानाच आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मोहीम करोना संकटकाळात सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत २९.५० लाख शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

विविध घटकांना दिलासा

करोनाकाळात राज्यातील विविध घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. कुपोषित बालकांना आणि गरोदर आणि स्तनदा मातांना एका वर्षांकरिता मोफत दूध भुकटी देण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांसाठी १०० टक्के खावटी अनुदान योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तसेच राज्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना ७०० कोटींची मदत देण्यात आली आहे. पूर्व विदर्भात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरातील बाधितांसाठी तातडीची मदत म्हणून १८ कोटी देण्यात आले आहेत. या पूरग्रस्तांना गतवर्षीच्या कोल्हापूर-सांगली येथील पुरातील बाधितांना देण्यात आलेल्या मदतीप्रमाणे मदत देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.