मुंबईतील साकीनाका परिसरात एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शुक्रवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने जोर धरला आहे. अशातच साकीनाका परिसरातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याचा दुर्देवी प्रकार घडला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशनम दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे आणि मुंबईत संरक्षक भिंत कोसळल्याचा प्रकार घडला होता.

यापूर्वी मालाडमधील राणी सती मार्गावर पालिकेच्या जलाशयाची २० फूट उंच भिंत आजूबाजूच्या झोपड्यांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल २१ जणांचा झोपेतच मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये सात बालके आणि सहा महिलांचा समावेश होता. तर पवई चांदिवली येथे इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणचा रस्ताच वाहून गेल्याची घटना घडली होती. तर मुलुंडमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून सुरक्षारक्षक ठार झाला होता.