अंतिम वर्षांच्या परीक्षांप्रमाणेच आता मुंबई विद्यापीठाच्या या शैक्षणिक वर्षांतील सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार आहेत. मात्र, अंतिम वर्षांच्या निकालातील गुणांची उधळण पाहून प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल करण्याचा विचार सुरू आहे.

विद्यापीठाचे अनेक अभ्यासक्रम  सत्र पद्धतीनुसार आहेत. म्हणजेच प्रत्येक सत्राला स्वतंत्र विषय अभ्यासण्यासाठी असतात आणि प्रत्येक सत्राची परीक्षाही होते. गेल्या शैक्षणिक वर्षांतील अंतिम वर्षांच्या महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन घेण्यात आल्या. त्यांचे निकालही जाहीर झाले. घरी बसून परीक्षा देण्याची मुभा, बहुपर्यायी प्रश्न पत्रिका, महाविद्यालयांकडून पुरवण्यात आलेले प्रश्नसंच यांमुळे निकालात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली.

अंतिम वर्षांचे निकाल २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढले. विधि विद्याशाखेतही शेकडो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. आता या शैक्षणिक वर्षांतील सत्र परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मात्र, गुणांची खिरापत रोखण्यासाठी परीक्षेच्या आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात काही बदल करण्याते येणार आहेत. नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

बदल कसे?:  तासाभरात सोडवण्यासाठी दिलेले प्रश्न  अवघे २५ होते. बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्न म्हणजेच चार पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडण्यासाठी एका प्रश्नासाठी जवळपास दोन मिनिटे मिळत होती. त्यामुळे सत्र परीक्षेसाठी प्रश्नांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यंदा अद्याप प्रात्यक्षिकेही झालेली नाहीत. त्यासाठीही पर्याय शोधण्यात येत आहे.