‘काँग्रेस-राष्ट्रवादी नालायक ठरल्यानेच जनतेने आपल्याला निवडून दिले, तेव्हा जनतेचा हा कौल लक्षात घेऊन अडचणीत असलेल्या शेतकरीवर्गाला मदत केली पाहिजे. अन्यथा शेतकरीवर्ग आपल्यालाही नालायक ठरवील, असे परखड मत व्यक्त करीत, काही मर्यादेत तरी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी भूमिका बुधवारी विधानसभेत मांडून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी कर्जमाफीसाठी भाजपवर दबाव वाढविला.
कर्जमाफीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असतानाच शिवसेनेनेही त्या सुरात सूर मिसळून भाजपवर कुरघोडी केली आहे. कर्जमाफीच्या मुद्दय़ावर सलग तिसऱ्या दिवशी विधिमंडळात गोंधळ झाला. मंगळवारी अभिरूप विधानसभा भरविणाऱ्या विरोधकांनी ‘चंद्रभागेला पूर आला, पाणी वडाला लागले, देवेंद्र सांगे नरेंद्रला सरकार आपले बुडाले’ अशा घोषणा देत सारे विरोधी नेते आणि आमदारांनी विधानभवनात टाळ-मृदुंगाच्या साथीने दिंडी काढली होती. दिंडीचे चित्रीकरण करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुरक्षारक्षकांनी अडविल्याने विरोधक संतप्त झाले. अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी सुरक्षा अधिकाऱ्याला जाब विचारला व सारे विरोधी आमदार विधान भवनाच्या प्रवेशद्वारापाशी बसून घोषणाबाजी करू लागले. शेवटी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आत सोडल्यावर विरोधी सदस्यांनी विधान भवनात प्रवेश केला. कर्जमाफीच्या मुद्दय़ावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि जयंत पाटील यांची मागणी अध्यक्षांना फेटाळून लावल्यावर विरोधी सदस्यांनी कामकाजावर लागोपाठ तिसऱ्या दिवशी बहिष्कार घातला. विरोधकांच्या अनुपस्थितीत दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला. पाणी आणि वीज या दोन मुद्दय़ांवर सर्वसामान्य जनतेने आपल्याला कौल दिला. शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढूनही २०० आमदार निवडून आले, तेव्हा आपल्याला निवडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शेतकऱ्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. शेतकऱ्याला राजा म्हणायचे आणि त्यालाच हिणवायचे हे बरोबर नाही. राष्ट्रवादीने सत्तेत असताना फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला, अशी टीका केली जाते. पण पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादीला नाकारले. याचा बोध घेऊन सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली. या परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे यापूर्वीचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत अनिल गोटे (भाजप) यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी विदर्भात सहा हजार कोटींचे सिंचनाचे प्रकल्प राबविले जातात, पण मराठवाडय़ाला निधी देताना हात आखडता घेतला जातो, असा आरोप केला.

‘..तर सत्ता मिळणे कठीण होते’
पृथ्वीराज चव्हाण यांनी जलयुक्त शिवाराचा कार्यक्रम तयार केला होता. यातून माण, खटाव तालुक्यातील पाणीटंचाई दूर झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीतील वादात या कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी झाली नाही. जर हा कार्यक्रम योग्यपणे राबविला असता तर आपल्याला सत्ता मिळणे कठीण होते, असेही मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज असल्याने कर्जमाफी देता येणार नाही, असे आपले नेते सांगतात, पण शेतकऱ्यांना हे कसे समजविणार, असा सवाल करीत डोक्यावरील बोजा खाद्यांवर घ्या, पण निदान एक लाखापर्यंत तरी कर्जमाफी करा, अशी मागणीही पाटील यांनी केली.