मुंबई विद्यापीठाच्या ‘आईस’ या उपक्रमाअंतर्गत शनिवारी (२मार्चला) ‘होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट’चे ज्येष्ठ संशोधक प्रा. शरद काळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. संशोधन आणि अध्ययन क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी प्रत्येक शनिवारी विद्यापीठातर्फे व्याख्यान आयोजित केले जाते. १३ एप्रिलपर्यंत हा उपक्रम चालेल. प्रा. काळे ‘निसर्गाचे ऋण संकल्पना आणि शाश्वत जीवन’ या विषयावर प्रा. काळे बोलतील.
खतांमुळे जमिनीच्या क्षारतेत होणारी वाढ आणि पर्यावरणाचे प्रदूषण हे प्रा. काळे यांच्या संशोधनाचे मुख्य विषय आहेत. २००१मध्ये त्यांनी ‘सॉलिड बायोडिग्रेडेबल वेस्ट प्रोसेसिंग’ या विषयावर काम करण्यास सुरुवात केली. आपल्या संशोधनाअंती त्यांनी या प्रश्नावर निसर्गऋण ही संकल्पना मांडली. काळे यांनी विकसित केलेल्या तंत्राच्या आधारे स्वयंपाकघर, शेती, भाजीबाजार, अन्न आणि प्रक्रिया उद्योगांमधून तयार होणाऱ्या जैव कचऱ्याचे विघटन करणे सोपे झाले आहे. सध्या हे तंत्र देशभरातील विविध राज्यांनी व उद्यांग समुहांनी स्वीकारले आहे. या शिवाय सौर उर्जेच्या माध्यमातून जलशुद्धीकरण, खते विकास आदी क्षेत्रातील त्यांचे संशोधनही उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विद्यापीठाशी संलग्नित विद्यार्थ्यांना या व्याख्यानांना हजेरी लावता येईल. शनिवारी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता भवन येथे हे व्याख्यान होईल.