मुंबई : कुलाबा ते सीप्झ या ‘मेट्रो -३’ भुयारी मार्गिकेवरील भुयारीकरणाच्या सतराव्या टप्प्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. ‘वैनगंगा ३’ हे टनेल बोअरिंग मशिन (टिबीएम) सीप्झ मेट्रो स्थानक येथे भुयारीकरण पूर्ण करून बाहेर आले. ‘वैनगंगा ३’ ( टिबीएम ) यंत्राने सारीपुतनगर ते सीप्झ मेट्रो स्थानक हे ५७४ मीटर अंतराचे भुयारीकरण पूर्ण केले. या मार्गिकेनंतर ‘मेट्रो ३’च्या भुयारीकरणाचा सतरावा टप्पा पूर्ण झाला. या भुयारामुळे ‘मेट्रो ३’च्या एकूण मार्गिकेवरील ३२.२६१ किमी भुयारीकरण पूर्ण झाले.

सारीपूतनगर येथील विवरापासून (लाँचिंग शाफ्ट) वैनगंगा ३ या टिबीएमने ९ एप्रिल २०१९ ला भुयारीकरणाची सुरुवात केली होती. दर दिवशी ४.५५ मीटर या वेगाने वैनगंगा ३ या टिबीएमने १२६ दिवसात हा टप्पा पूर्ण केला. या टप्प्यासाठी एकूण ४१० सेगमेन्ट रिंग्ज वापरण्यात आल्या. सतराव्या टप्प्यानंतर पॅकेज ७ अंतर्गत ७.०७९ किमी मार्गिकेपैकी ५.८७ किमी भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पॅकेज ७ मधील भुयारीकरणाचा हा सहावा टप्पा असून लवकरच आणखीन दोन टप्पे पूर्ण होतील.