मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. त्यांनी संपूर्ण राज्याचा विचार करणे गरजेचे असताना दुष्काळाच्या मुद्दय़ावर जर ते केवळ विदर्भ आणि मराठवाडय़ाला मदत करत असतील तर ते चुकीचे असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केली.
पवार म्हणाले, की मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख दिसला पाहिजे. तो विभागाचा प्रमुख दिसला तर लोकांच्यात अस्वस्थता येते. गेल्या काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाडय़ाला मदत होत आहे. अपुऱ्या पाटबंधारे योजना पूर्ण करण्याबाबतही केवळ विदर्भाला सहकार्य केले आहे. महाराष्ट्रातील उर्वरित दुष्काळी भागात दीर्घ स्वरूपात कार्यक्रम राबविला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातही सांगलीतील कवठे महांकाळ, आटपाडी, साताऱ्यातील खटाव, माण, कराडमधील काही गावे, सोलापूर, नगर, पुणे येथेही दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे या भागासही सरकारने मदत करणे अपेक्षित आहे. राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी या भागालाही मदत करणे अपेक्षित आहे. असे असताना मुख्यमंत्री केवळ विदर्भ आणि मराठवाडय़ाला मदत करत आहेत.
सध्या गाजत असलेल्या ‘ऑगस्टा वेस्टलँड’ हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणावर बोलताना पवार म्हणाले, की सैन्यासाठी शस्त्रास्त्रे खरेदीचा व्यवहार हा तज्ज्ञ समिती ठरवत असते. त्याबाबत शंका उपस्थित करणे किंवा या शंकांमुळे शस्त्रास्त्र खरेदी थांबवणे याचा परिणाम भयावह होऊ शकतो. देशाच्या संरक्षण हिताच्या दृष्टीने शस्त्रास्त्र खरेदी करणे सुरूच ठेवले पाहिजे. तसेच याचा सैन्याच्या मनोधर्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना पवार म्हणाले, की मोदींची लाट आता ओसरली आहे. केंद्रात जरी तो पक्ष असला तरी केरळ, तमिळनाडू, पं. बंगालमध्ये त्यांना संधी मिळणार नाही. पण ओरिसात कदाचित काँग्रेस किंवा भाजप मोठा पक्ष म्हणून काम करतील. स्वतंत्र विदर्भावर पवार म्हणाले, की आम्हाला महाराष्ट्र एकसंध हवा आहे. लोकांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. कुणीतरी चार लोक मागणी करतात म्हणजे ती जनतेची मागणी होत नाही.
तर भुजबळांना किंमत मोजावी लागेल- पवार
छगन भुजबळांवरील कारवाईबाबत पवार म्हणाले, की या प्रकरणी तपास सुरू आहे. जर त्यांनी काही चूक केली असेल तर त्याची किंमत द्यावी लागेल. पण जर चूक नसताना त्यांना दोषी ठरवले जात असेल तर त्याची किंमत सरकारला द्यावी लागेल आणि भुजबळांचे निर्दोषत्व सिद्ध होईल. याबाबत सरकार सूडबुद्धीने वागते असे मी म्हणणार नाही. काही ठिकाणी सत्तेचा गैरवापर केल्याचे दिसते. पण ज्या वेळी एखादा आरोप केला जातो आणि त्यावर कारवाईची भूमिका घेतली जाते. त्या वेळी त्या कारवाईची वस्तुस्थिती काय आहे. हे लोकांसमोर स्पष्ट केले पाहिजे.