चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादीची घसरण झाली. तेव्हापासूनच राष्ट्रवादीचा उलटा प्रवास सुरू झाला. यंदा तर शरद पवार यांना माढा मतदारसंघाच्या रिंगणातून माघार घेण्याची वेळ आली. पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांनी उभे केलेले संस्थान या निवडणुकीत खालसा होईल, असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे.

भाजप-शिवसेना युती, भाजपची रणनीती, लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दुष्काळी परिस्थिती हाताळण्याचे आव्हान अशा विविध प्रश्नांवर चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला वातावरण पूर्णपणे अनुकूल असून, आतापर्यंत कधी मिळाले नाही एवढे यश यंदा मिळेल, असा विश्वास चंद्रकांतदादांनी व्यक्त केला.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यात ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यापेक्षा कमी जागा मिळाल्यास विजय मानता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एवढे यश मिळणे सोपे आहे का ?

विदर्भ, मुंबई-ठाणे, खान्देश, कोकणातील सर्व जागा सहजपणे जिंकू. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात एखाद-दुसऱ्या जागेवर आव्हान आहे. हे मतदारसंघही काबीज करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात युतीला वातावरण पूर्ण अनुकूल आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे विरोधक पूर्णपणे नामहोरम झाले आहेत. आघाडीत जास्त मित्र पक्षही सहभागी झालेले नाहीत. आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अजून सुरू आहे. सामान्य जनता गेल्या पाच वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारच्या कामगिरीवर खूश आहे. हे निकालात बघायला मिळेल.

भाजप आणि शिवसेना सरकारच्या विरोधात शेतकरी वर्गात नाराजी आहे. शेतकरी वर्गातील नाराजीचा भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये फटका बसला. अद्यापही कर्जमाफीचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना झालेला नाही. विविध आघाडय़ांवर सरकारला यश आलेले नाही. तरीही एवढय़ा यशाची अपेक्षा शक्य वाटते का ?

मोदी आणि फडणवीस सरकारच्या काळात चांगले काम झाले. राज्यातील सुमारे दीड कोटी जनतेला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला. मग त्यात परवडणारी घरे, उजाला योजना आदींचा समावेश आहे. सर्व दीड कोटी मते मिळणार नाहीत हे मान्य. पण यातील बहुतांशी मतदार सरकारच्या कामांवर मोहोर उठवतील. राज्यात भाजपला एक कोटी ते सव्वा कोटी मते मिळतात. शिवसेनेची मते अधिक केल्यास दोन कोटींपेक्षा जास्त मते युतीला मिळतील. राज्यात सुमारे साडेआठ कोटी मतदार असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होते. दोन कोटींपेक्षा जास्त मते मिळाल्यास युतीचे सर्वाधिक खासदार निवडून येऊ शकतात. विरोधक आधीच गोंधळलेले आहेत. यामुळे युतीला निर्भळ यश मिळण्यात काहीच अडचण येईल, असे वाटत नाही.

विरोधक एकत्र आल्यानेच भाजपने शिवसेनेपुढे मैत्रीचा हात पुढे केला. विधानसभेसाठी मित्र पक्षाला जास्त जागा देण्याची तयारी दर्शविली. लोकसभेसाठी शिवसेनेला एक अतिरिक्त जागा दिली. भाजपला स्वबळावर यशाची अपेक्षा नव्हती का?

भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. उभयतांमध्ये मधला काही काळ काहीशी कटुता आली होती. पण केंद्र व राज्याच्या सत्तेत शिवसेना आमच्याबरोबर होती. दोघेही वेगळे लढलो असतो तर काही प्रमाणात मतविभाजन झाले असते. ही बाब दोन्ही पक्षांच्या नेत्यांना मान्य झाली. यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले. विरोधकांची आम्हाला धास्ती वाटण्याचे कारणच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात यश मिळायचे. पण पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. काँग्रेस तर सर्वत्रच कमकुवत झाली आहे. अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोन्ही विद्यमान खासदार लढण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कितीही आव आणला तरी राष्ट्रवादीचा आलेख उतरणीचा आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसेल. शरद पवारांच्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असेल.

राज्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाडय़ासह काही भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गहन झाला असून, टँकर्सची संख्या वाढत आहे. ऐन उन्हाळ्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसू शकतो. यावर  मत काय आहे ?

दुष्काळाच्या झळा बसतील हे गृहीत धरून आधीच उपाय योजण्यात आले. पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास टँकर्सने पाणीपुरवठा करण्याचे आदेश आहेतच. जनावरांसाठी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त छावण्या सुरू झाल्या आहेत. राज्याच्या ग्रामीण भागांत २३ एप्रिलला मतदान संपत आहे. हा तेवढाच दिलासा आहे. कर्जमाफीच्या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. केंद्र सरकारच्या नव्या योजनेनुसार राज्यातील ४० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत. याशिवाय राज्यातील ५७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये सरकारच्या दुष्काळी मदतीचे पैसे जमा झाले आहेत. आधीच्या सरकारच्या काळात दुष्काळी परिस्थिती तीव्र झाल्यावर उपाय योजण्यात येत असत. यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नसे तसेच निधीही जास्त खर्च होई. आमच्या सरकारने आधीच नियोजन केले. शेतकऱ्यांना फटका बसणार नाही या पद्धतीने उपाय योजण्यात आले. गेल्या पाच वर्षांत दुष्काळी परिस्थिती हाताळण्यावरून राज्यात कोठेच मोठे आंदोलन झालेले नाही.

भाजप नेतृत्वाशी सौहार्दाचे

संबंध असलेले चंद्रकांतदादा पाटील हे राज्यातील ज्येष्ठ मंत्री आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढविण्यात त्यांनी योगदान दिले. अभाविप व संघाची पाश्र्वभूमी असलेल्या चंद्रकांतदादांनी राज्यात विरोधकांचे आव्हान नसल्याने लोकसभा निवडणुकीत युतीला  उत्तम यश मिळेल, असा विश्वास  व्यक्त केला आहे.