पीटर मुखर्जी आणि इंद्राणी या दोघांनी आज घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मुंबईतील बांद्रा येथे असलेल्या कुटुंब न्यायालयात या दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी हे दोघेही घटस्फोट घेणार हे आधीच ठरले होते. इंद्राणी मुखर्जीला सहमतीने घटस्फोट देण्यास राजी असल्याचे पीटर मुखर्जीने जून महिन्यात कळवले होते. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात हे दोघेही तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला वेळ लागणार होता. आज या दोघांनी अर्ज दाखल केल्याची माहिती एएनआयने दिली.

एप्रिल महिन्यात इंद्राणीने पीटरला घटस्फोटाची नोटीस पाठवली. आपल्या दोघांमधील पती-पत्नीनेचे नाते पुन्हा कधीही जुळण्यापलिकडे गेलं आहे असे या नोटीसमध्ये इंद्राणीने म्हटले होते. पीटरनेही या नोटीसला होकार देत रिजस्टर पोस्टाने उत्तर पाठवले.

एप्रिल २०१२ मध्ये इंद्राणीने तिच्या मुलीची अर्थात शीना बोराची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली. २०१५ मध्ये या प्रकरणाचा खुलासा झाला होता. याप्रकरणी पीटर आणि इंद्राणी आणि इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरु आहे.