मुंबईची प्रवासवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे पूल व परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मनसेने उभारलेल्या आक्रमक आंदोलनाला विरोध करत मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरली असली, तरी मुंबईकरांना विकासाची स्वप्ने दाखवत पालिकेतील सत्तेचा सोपान गाठणारी शिवसेना व भाजप मात्र अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प राहणेच पसंत केले आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आक्रमक होत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईकरांच्या ‘संताप मोर्चा’चे आयोजन केले होते. रेल्वे पूल व परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाला पंधरा दिवसांची मुदत दिली, व सोळाव्या दिवशी मनसे अनधिकृत फेरीवाल्यांवर आपल्या पद्धतीने कारवाई करेल असा इशारा दिला होता. त्यानंतर राज यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन पालिकेनेही ठोस कारवाई करावी असे निवेदन सादर केले. राज यांच्या भेटीनंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी फेरीवाल्यांवरील दंडात्मक कारवाईच्या रकमेत वाढ केली. मनसेने फेरीवाल्यांविरोधात भूमिका घेतल्यापासून मुंबईच्या उपनगरीय रेल्वे परिसरातील फेरीवाले जवळपास गायब झाले होते. जे काही थोडेफार फेरीवाले होते त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून पिटाळून लावले. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेत तब्बल २३ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर तेथे भाजप व शिवसेनेचे नेतेही पोहोचले होते. तथापि रेल्वे परिसरातील फेरावाल्यांच्या मुद्दय़ावर शिवसेना व भाजपचे नेते गप्प बसून आहेत. मनसेने फेरीवाल्यांना मारहाण केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेत मनसेवर तुटून पडले एवढेच नव्हे तर थेट सेना-मनसेच्या बालेकिल्ल्यात दादरमध्ये फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन केले. मात्र शिवसेनेने अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावर ना पालिकेत तोंड उघडले ना रस्त्यावर काही ‘करून दाखवले’. यातून शिवसेनाही परप्रांतीयांच्या मतांसाठी किती लाचार आहे तेच दिसून येते असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची भूमिका मांडली असली तरी मुंबई भाजपचे नेते तसेच पालिकेतील भाजपचे नगरसेवक अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर गप्प बसून असल्याचे नांदगावकर म्हणाले. एरवी रेल्वेचा पुळका असलेले किरीट सोमय्या आता कोठे गायब झाले आहेत असा सवालही त्यांनी केला.

एल्फिन्स्टन पूल बांधणीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री, रेल्वे मंत्री तसेच मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांनी भेट दिल्यानंतर शिवसेनेला डावलले म्हणून टाहो फोडणारे सेनेचे नेते फेरीवाल्यांच्या प्रश्नावर रस्त्यावरही दिसत नाहीत आणि ज्या पालिकेत त्यांना चौथ्यांदा सत्ता मिळाली तेथेही तोंड बंद करून का बसले आहेत, असा सवाल नांदगावकर यांनी केला. मतांसाठी कोणत्याही थराला जाणारे शिवसेना व भाजप आज अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावर गप्प बसून मुंबईकरांची वाट लावून दाखवत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.